एखाद्या शेअरमध्ये येणारी तेजी ही बऱ्याच वेळा त्या कंपनीशी संबंधित सकारात्मक निर्णय किंवा घटनांमुळं येत असते. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या शेअरच्या बाबतीतही हेच घडलं आहे. या कंपनीनं भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) एका प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली आहे. त्यामुळं कंत्राट मिळण्याची शक्यता दिसताच गुंतवणूकदार शेअरवर तुटून पडले आहेत.
पॉलीकॅब इंडियानं शेअर बाजाराला नव्या ऑर्डर संदर्भात माहिती दिली आहे. कर्नाटक, गोवा आणि पुद्दुचेरीमध्ये भारत नेटच्या मिडल माईल नेटवर्कचे बांधकाम, आधुनिकीकरण, संचालन आणि देखभालीसाठी सर्वात कमी बोली पॉलीकॅबनं लावली आहे. कंपनी डिझाइन, बिल्ड, ऑपरेट अँड मेंटेन (डीबीओएम) मॉडेलवर प्रकल्प सुरू करणार आहे. हे कंत्राट तब्बल ४०९९.६९ कोटी रुपयांचं आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनी तीन वर्षांत मिडल माईल नेटवर्क तयार करेल.
करारानुसार, पॉलीकॅब इंडिया या प्रकल्पाची १० वर्षांसाठी देखभालही करणार आहे. देखभालीसाठी पहिल्या पाच वर्षांसाठी वार्षिक भांडवली खर्चाच्या ५.५ टक्के आणि पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक भांडवली खर्चाच्या ६.५ टक्के खर्च येणार आहे.
बीएसई निर्देशांकावर पॉलीकॅब इंडियाचा शेअर आज ५ टक्क्यांहून अधिक वधारून ६९३४.१५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी हा शेअर ७६०७.१५ रुपयांवर होता. तो शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता. तर, जानेवारी २०२४ मध्ये हा शेअर ३८१२.३५ रुपयांवर होता. हा ५२ आठवड्यांतील नीचांका होता. गेल्या वर्षभरात पॉलीकॅब इंडियाच्या शेअरमध्ये सुमारे ३२ टक्के वाढ झाली आहे.
पॉलीकॅब इंडियाचा महसूल आर्थिक वर्ष २०२५ च्या सप्टेंबर तिमाहीत ३० टक्क्यांनी वाढून ५४९८.४ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी तो ४२१७.७ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२५ च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात जून तिमाहीतील ४६९८ कोटी रुपयांच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ३ टक्क्यांनी वाढून ४२९.७७ कोटी रुपयांच्या तुलनेत ४४५.२१ कोटी रुपये झाला आहे.