PNB Q1 Results : पंजाब नॅशनल बँकेची दमदार कामगिरी; नफा १५९ टक्क्यांनी वाढला, शेअरही तेजीत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PNB Q1 Results : पंजाब नॅशनल बँकेची दमदार कामगिरी; नफा १५९ टक्क्यांनी वाढला, शेअरही तेजीत

PNB Q1 Results : पंजाब नॅशनल बँकेची दमदार कामगिरी; नफा १५९ टक्क्यांनी वाढला, शेअरही तेजीत

Jul 27, 2024 06:59 PM IST

PNB Q1 Results : पंजाब नॅशनल बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या तिमाहीत बँकेचं एकूण उत्पन्न ३२,१६६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

पंजाब नॅशनल बँकेची दमदार कामगिरी; पहिल्याच तिमाहीत नफा १५९ टक्क्यांनी वाढला!
पंजाब नॅशनल बँकेची दमदार कामगिरी; पहिल्याच तिमाहीत नफा १५९ टक्क्यांनी वाढला!

PNB Q1 Results : पंजाब नॅशनल बँकेनं चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार, पहिल्या तिमाहीत बँकेचा नफा दुपटीनं वाढून ३,२५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,२५५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

पंजाब नॅशनल बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न ३२,१६६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील वर्षी याच तिमाहीत एकूण उत्पन्न २८,५७९ कोटी रुपये होतं. जून तिमाहीत बँकेचं व्याजातून मिळणारं उत्पन्न वाढून २८,५५६ कोटी रुपये झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते २५,१४५ कोटी रुपये होतं.

एनपीएमध्ये सुधारणा

जून २०२४ पर्यंत बँकेचा एकूण एनपीए घसरून ४.९८ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ७.७३ टक्के होता. जून तिमाहीनंतर निव्वळ एनपीएही ०.६० टक्क्यांपर्यंत घसरला. जून २०२४ अखेर बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीएआर) वाढून १५.७९ टक्के झालं आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते १५.५४ टक्के होतं.

शेअर्सची घोडदौड सुरू

पीएनबीची शेअर मार्केटमध्येही घोडदौड सुरू आहे. बँकेच्या शेअरचा भाव रॉकेटच्या वेगानं वाढत आहे. शुक्रवारी शेअरचा भाव ११९.९० रुपये होता. आदल्या दिवसाच्या तुलनेत शुक्रवारी त्यात १.८७ टक्क्यांनी वाढ झाली. ३० एप्रिल २०२४ रोजी शेअरचा भाव १४२.९० रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये हा शेअर ५८.६० रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे.

बँकेला ठोठावण्यात आलाय १.३१ कोटींचा दंड

केवायसी, कर्ज वितरण आणि अ‍ॅडव्हान्सशी संबंधित काही निर्देशांचं पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पंजाब नॅशनल बँकेला १.३१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पीएनबीनं सबसिडी/ रिफंड आणि भरपाईच्या स्वरूपात मिळणाऱ्या निधीच्या बदल्यात दोन राज्य सरकारच्या अखत्यारीतील महामंडळांना वर्किंग कॅपिटल डिमांड डेब्ट मंजूर केली होती. तसंच, काही व्यावसायिक ग्राहकांची ओळख आणि पत्त्यासंदर्भातील नोंदी जतन करण्याच्या बाबतीत बँकेच्या काही खात्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.

Whats_app_banner