PNB FD Rates News : गेल्या काही दिवसांपासून बँकांमधील फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरांत सातत्यानं वाढ होत आहे. पंजाब नॅशनल बँकेनंही आता दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवरील एफडीच्या व्याजदरांत बदल केला आहे. बँकेनं विशिष्ट कालावधीच्या एफडींवर ५० बेसिस पॉईंट्सपर्यंत (बीपीएस) वाढ केली आहे. नवे दर १ जानेवारी २०२४ पासून लागू झाले आहेत.
बँकेनं १८० ते २७० दिवसांच्या मुदतीच्या व्याजदरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. या मुदत ठेवींवर आता सर्वसामान्य नागरिकांना ६ टक्के व्याज मिळणार आहे.
२१७ ते १ वर्षापर्यंतच्या एफडीचे दर ०.४५ टक्क्यांनी वाढवले आहेत. या एफडीवर आता सर्वसामान्य नागरिकांना ७.२५ टक्के व्याज मिळणार आहे.
४०० दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात बँकेनं ०.४५ टक्क्यांची वाढ केली असून आता हे दर ६.८० टक्क्यांवरून ७.२५ टक्क्यांपर्यंत गेले आहेत.
नव्या दरानुसार, ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ३.५ ते ७.२५ टक्के व्याज मिळणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेनं ४४४ दिवसांवरील एफडीच्या व्याजदरांत ७.२५ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ०.४५ टक्क्यांची कपात केली आहे.
नवीन व्याजदरांनुसार, ७ दिवस ते १० वर्षे कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ४ ते ७.७५ टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ४.३० ते ८.०५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) २७ डिसेंबरपासूनच मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात वाढ केली आहे. हा व्याजदर २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर लागू आहे. त्यानुसार, ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ३.५ ते ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या ठेवींवर ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे.
बँक ऑफ बडोदानं रिटेल टर्म डिपॉझिटवरील व्याजदरात ०.१० टक्के १.२५ टक्के वाढ केली आहे. हे दर २९ डिसेंबरपासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर लागू आहेत. नव्या दरांनुसार, बँक ऑफ बडोदाच्या सर्वसामान्य ग्राहकांना ४.२५ ते ७.२५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ४.७५ ते ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.