PNB news : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १ जुलैपासून ही बचत खाती बंद होणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PNB news : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १ जुलैपासून ही बचत खाती बंद होणार

PNB news : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १ जुलैपासून ही बचत खाती बंद होणार

Updated Jun 19, 2024 02:49 PM IST

जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर पीएनबी अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेली बचत खाती बंद करणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १ जुलैपासून ही बचत खाती बंद होणार
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १ जुलैपासून ही बचत खाती बंद होणार

PNB News : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पीएनबी बँकेनं निष्क्रिय बचत खात्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील ३ वर्षांपासून कोणताही व्यवहार न झालेली आणि शिल्लक नसलेली सर्व खाती बंद करण्यात येणार आहेत. १ जुलैपासून ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही कार्यवाही केली जाणार आहे.

डीमॅट, लॉकर किंवा काही गोष्टींशी जोडलेली खाती असल्यास ती बंद केली जाणार नाहीत. २५ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या खात्यांव्यतिरिक्त पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय, एसएसवाय, एपीवाय, डीबीटी सारख्या विशिष्ट योजनांसाठी उघडण्यात आलेल्या खात्यांवरही परिणाम होणार नाही. तसंच, न्यायालयाचे आदेश, प्राप्तिकर विभाग किंवा अन्य वैधानिक प्राधिकरणांच्या आदेशानं गोठवलेली खातीही निष्क्रियतेमुळं बंद केली जाणार नाहीत.

खातं बंद होऊ द्यायचं नसेल तर…

आपल्या बँकेच्या शाखेत केवायसी कागदपत्रं सादर करून खातं बंद होण्यापासून रोखू शकता.  केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओळखपत्र (पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स) आणि पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, वीज बिल, पाणी बिल, गृहकर पावती इ.) सादर करणं आवश्यक आहे.

सुरक्षाविषयक जोखीम कमी करण्यासाठी आणि निष्क्रिय खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी पंजाब नॅशनल बँकेनं हे पाऊल उचललं आहे. बनावट केवायसी तपशील वापरून, निष्क्रिय खात्यांचा वापर करून डेटामध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले आहेत. या संदर्भात पंजाब नॅशनल बँक सातत्यानं सोशल मीडियावर ग्राहकांना सावध करत आहे. बँकेच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नुकतीच ही माहिती देताना ग्राहकांना या कारवाईची माहिती दिली जाणार नसल्याचं सांगण्यात आलं होते. म्हणजेच ग्राहकाच्या नकळत बँक खाते बंद केलं जाणार आहे.

Whats_app_banner