शेअर बाजारात दाखल झालेल्या पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा शेअर सोमवारी मुंबई शेअर बाजारात १० टक्क्यांनी वधारून ८०६.४५ रुपयांवर पोहोचला. नवीन स्टोअर्स उघडण्याशी संबंधित योजना जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्स या नवरात्रोत्सवात ९ दुकाने उघडणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ८४३.८० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 681.35 रुपये आहे.
आयपीओ आला ४८० रुपये, शेअर्सने ५ दिवसांत ८०० चा टप्पा ओलांडला
पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओमधील शेअरची किंमत ४८० रुपये होती. कंपनीचा आयपीओ 10 सप्टेंबर 2024 रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि 12 सप्टेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीचा शेअर १७ सप्टेंबर २०२४ रोजी बीएसईवर ८३४ रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर ७९२.८० रुपयांवर बंद झाला. २३ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ८०६.४५ रुपयांवर बंद झाला. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचा पब्लिक इश्यू आकार ११०० कोटी रुपयांपर्यंत होता.
पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ एकूण ५९.४१ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा १६.५८ पट सब्सक्राइब झाला होता. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीत ५६.०८ पट हिस्सा दिसून आला. तर पात्र संस्थात्मक खरेदीदार वर्गाला १३६.८५ पट वर्गणी मिळाली. पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी सट्टा लावू शकतात. आयपीओच्या एका लॉटमध्ये ३१ शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओच्या एका लॉटसाठी १४८८० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.