मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sarkari yojana : अवघ्या ५ टक्के व्याजानं ३ लाखांचं कर्ज; काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कोणाला मिळू शकतो लाभ? वाचा!

Sarkari yojana : अवघ्या ५ टक्के व्याजानं ३ लाखांचं कर्ज; काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कोणाला मिळू शकतो लाभ? वाचा!

Jul 02, 2024 01:50 PM IST

sarkari Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेमुळं छोट्या कारागिरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी…

अवघ्या ५ टक्के व्याजानं ३ लाखांचं कर्ज; काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कोणाला मिळू शकतो लाभ? वाचा!
अवघ्या ५ टक्के व्याजानं ३ लाखांचं कर्ज; काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कोणाला मिळू शकतो लाभ? वाचा!

pm Vishwakarma yojana : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दुसऱ्या कार्यकाळात अनेक योजना सुरू केल्या. या योजनांचा थेट फायदा गरीब वर्गाला मिळतो आहे. पीएम विश्वकर्मा योजना ही त्यापैकीच एक आहे. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

पीएम विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे? या योजनेचे लाभ नेमके कोणाला मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर…

काय आहे ही योजना?

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं (MSME) पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. कारागीर आणि कसबी कलावंताना आर्थिक आधार देणं हे या सरकारी योजनेचं उद्दिष्ट आहे. ही योजना पारंपारिक कारागिरांना प्रशिक्षण, तंत्रज्ञान, कर्ज आणि बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या कुशलतेस चालना देते.

ट्रेंडिंग न्यूज

या योजनेच्या कक्षेत १८ व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. यात सुतार, बोट बनवणारे, अवजारं बनवणारे, लोहार, हातोडा व टूल किट बनविणारे, टाळे बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, दगड तोडणारे, पादत्राणे कारागीर, मिस्त्री, टोपली/चटई/झाडू बनविणारे/विणकर, बाहुली व खेळणी बनविणारा (पारंपारिक), नाभिक, हार बनविणारा, वॉशरमन, टेलर, धोबी आणि मासेमारी जाळी बनविणारे यांचा समावेश होतो. या पारंपारिक कारागिरांना 'विश्वकर्मा' म्हणून संबोधलं जातं.

३ लाख रुपयांपर्यंत कर्ज

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज १८ ते ३० महिन्यांच्या कालावधीसाठी मिळू शकतं. हे कर्ज विनातारण दिलं जातं. त्यासाठी कुठलीही वस्तू गहाण ठेवण्याची गरज नसते. कर्जावर ५ टक्के व्याज आकारलं जातं. तसंच हे कर्ज दोन टप्प्यांमध्ये दिलं जातं. पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपये दिले जातात.

मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलेले लाभार्थी १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज सहाय्याचा पहिला हप्ता घेण्यास पात्र असतील. दुसऱ्या टप्प्याचे कर्ज पहिल्या टप्प्याचा लाभ घेतलेल्यांना आणि स्टांडर्ड कर्ज खातं असलेल्यांना मिळतं. कर्जदारांना स्वत:च्या व्यवसायात डिजिटल व्यवहारांचा अवलंब करणं बंधनकारक असतं.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे…

आधार कार्ड

मतदार ओळखपत्र

व्यवसायाचा पुरावा

मोबाइल नंबर

बँक खाते तपशील

उत्पन्न प्रमाणपत्र

जातीचा दाखला (लागू असल्यास)

सविस्तर माहिती इथं मिळेल!

पीएम विश्वकर्मा योजनेची मार्गदर्शक तत्त्वे pmvishwakarma.gov.in या वेबसाइटवर पाहता येतील. योजनेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, आपण १८००२६७७७७७ वर कॉल करू शकता. pm-vishwakarma@dcmsme.gov.in या ईमेलद्वारेही माहिती मिळू शकते.

WhatsApp channel