मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा १७वा हप्ता अखेर बँक खात्यात

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा १७वा हप्ता अखेर बँक खात्यात

Jun 18, 2024 06:00 PM IST

PM Kisan Yojana 17th installment : सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने देशातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पहिली मोठी भेट दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता अखेर बँक खात्यात
शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता अखेर बँक खात्यात

PM Kisan Yojana 17th installment : नुकत्याच सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारनं देशातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पहिली मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये पाठविण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदींनी सर्वात आधी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी'च्या फाइलवर सही केली होती. मोदी हे मंगळवारी त्यांच्या वाराणसी या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाराणसी दौरा होता. याच दौऱ्यात त्यांनी ९.२६ कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी मंजूर केले आहेत.

पीएम किसान योजना काय आहे?

शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं २०१९ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीनं वर्ग केला जातो. या योजनेमुळं आतापर्यंत देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ३.०४ लाख कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे.

कशी कराल नोंदणी?

पीएम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी प्रक्रिया सोपी आहे. http://pmkisan.gov.in या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर जाऊन स्वत:ची नोंदणी करता येते. पीएम-किसान अंतर्गत नाव नोंदणीसाठी शेतकरी राज्य सरकारनं नियुक्त केलेले स्थानिक तलाठी, महसूल अधिकारी किंवा नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधता येतो. पीएम-किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नर, सीएससी आणि मोबाइल अॅपद्वारे नावनोंदणीसाठी विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे.

नवे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान काय म्हणाले?

१७ वा हप्ता वर्ग करण्यात आल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली. 'या आर्थिक मदतीमुळं शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर प्रासंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होईल. शेतकरी केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधांमुळं या योजनेचा लाभ मध्यस्थांच्या सहभागाशिवाय देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे, असं ते म्हणाले.

ते पुढं म्हणाले की, 'लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणीमध्ये पूर्ण पारदर्शकता राखत भारत सरकारनं देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ३.०४ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचं वाटप केलं आहे. या योजनेच्या सुरुवातीपासून लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आलेली एकूण रक्कम ३.२४ लाख कोटी रुपयांच्या पुढं गेली आहे.

WhatsApp channel