PM Kisan Yojana Installment News : देशातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता लवकरच मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं सांगितलं जात आहे.
डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांचा २००० हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे. हा हप्ता याच महिन्यात मिळेल असं बोललं जात आहे. याआधीचा १५ वा हप्ता ९ कोटी १ लाख ७३ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला होता.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे ११ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना एकूण ६ हजार रुपये दिले जातात. वर्षभरात तीन टप्प्यांत २ हजार रुपये प्रमाणे हे सहा हजार दिले जातात. या योजनेतून आतापर्यंत २.८० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
पाच वर्षांपूर्वी डिसेंबर-मार्च २०१८-१९ मध्ये ३ कोटी १६ लाख १६ हजार ९१८ शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर पहिल्यांदा २००० रुपये पाठवण्यात आले होते. तेव्हापासून या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे.
तुमचं नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २०२४ च्या यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा!
सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवर जा (https://pmkisan.gov.in/).
उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर पाहा. तिथं लाभार्थी यादीवर क्लिक करा.
एक नवीन विंडो उघडेल, जिथं आजची ताजी यादी सापडेल. या ठिकाणी तुमचं राज्य, जिल्हा, उपजिल्हा म्हणजे तहसील, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर Get Report वर क्लिक करा. तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुमच्या समोर असेल.
तुमचे कोणते हप्ते मिळाले किंवा मिळाले नाहीत? पैसे थांबले असतील तर त्याचं कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, तुमची लाभार्थी स्थिती तपासा. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा..
Know Your Status on Farmer Corner वर क्लिक करा.
इथं तुम्हाला एक नवीन विंडो उघडलेली दिसेल. दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा नोंदणी क्रमांक टाका. कॅप्चा कोड भरा आणि Get OTP वर क्लिक करा.
आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून तुमची स्थिती तपासा.
तुम्हाला नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर वरील निळ्या पट्टीवर तुमचा नोंदणी क्रमांक लिहिला जाईल हे जाणून घ्या. त्यावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा लिंक केलेला मोबाइल क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाकून नोंदणी क्रमांक मिळवा आणि पहिली स्टेप्स फॉलो करा.