PM Internship Scheme : तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्रातील मोदी सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेचा शुभारंभ काल (३ ऑक्टोबर) झाला आहे. पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत कंपन्यांकडून १०७७ पदांसाठी अर्ज आले.
ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून कंपन्या त्यांच्या इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत रिक्त पदांची संख्या सांगतील आणि उमेदवार अर्ज करू शकतील. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं इंटर्नशिप सुरू करण्यासाठी डेडलाइन निश्चित केली आहे. २ डिसेंबरपासून पहिल्या बॅचच्या उमेदवारांची इंटर्नशिप सुरू होईल.
इंटर्नशिप अंतर्गत कंपन्या १० ऑक्टोबरपर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना १२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान पोर्टलवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. ८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ऑफर लेटर पाठविण्यात येणार आहे, तर २ डिसेंबरपासून निवड झालेल्या तरुणांची इंटर्नशिप कंपन्यांमध्ये सुरू होणार आहे.
> पीएम इंटर्नशिप पोर्टलमध्ये देशातील ५०० टॉप कंपन्यांसह इतरही अनेक कंपन्यांचा समावेश.
> उमेदवारांना दर महिन्याला ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यातील ४५०० रुपये केंद्र सरकारकडून आणि ५०० रुपये कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देण्यात येतील.
> पूर्णवेळ नोकरी न करणारे किंवा पूर्णवेळ शिक्षण न घेणारे २१ ते २४ वयोगटातील इंटर्नशिपसाठी पात्र असतील.
> ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाशी संलग्न विद्यार्थी इंटर्नशिप कार्यक्रमासाठी पात्र असतील.
> २०२३-२४ या आर्थिक वर्षात ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त असेल, ते पात्र ठरणार नाहीत.
> कुटुंबातील एखादा सदस्य कायमस्वरूपी सरकारी नोकरी करत असेल तर अशा कुटुंबातील तरुण पात्र ठरणार नाहीत.
> हेल्पलाइन क्रमांक १८००-११६-०९० वर कॉल करून किंवा डब्ल्यू.पीएमइंटर्न ship.mca.gov.in वेबसाइटवर लॉग इन करून माहिती मिळवू शकता.
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचं पोर्टल उघडल्यानंतर मोठ्या संख्येनं कंपन्यांनी नोंदणी करून तरुणांना इंटर्न म्हणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर काही तासांतच म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत कंपन्यांनी १०७७ पदांसाठी नोंदणी केली होती. यात कृषी, ऑटोमोबाइल आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणाच्या सात जिल्ह्यांसाठी तरुणांची मागणी केली होती. तूर्य यात सध्या एकूण सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत तरुणांना त्यांच्या जिल्ह्यात, आजूबाजूच्या जिल्ह्यात किंवा स्वत:च्या राज्यात १२ महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरुणांनी कंपन्यांशी संबंधित काम जवळून समजून घेऊन त्याविषयी प्रशिक्षण घ्यावं, जेणेकरून त्यांना नंतर नोकरीची संधी मिळेल, असा सरकारचा प्रयत्न आहे.
संबंधित बातम्या