Petrol Diesel Price News : अनेक बाजूंनी महागाईचा मार सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तब्बल १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्या दर कपात करण्याचा विचार करत आहेत.
डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत तेल कंपन्यांचा नफा ७५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा कंपन्यांचा विचार आहे, असं हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्यास एकंदर महागाईला आळा बसण्यास मदत होणार असून त्याचा फायदा सर्वांना होणार आहे.
सरकारी रिटेल विक्रेत्या कंपन्यांनी एप्रिल २०२२ नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आता कंपन्यांनी किंमतीचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्यांना (OMCs) लिटरमागे मिळणाऱ्या १० रुपये नफ्याचं मार्जिन कमी करून त्याचा लाभ ग्राहकांना दिला जाऊ शकतो, असे संकेत संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आघाडीच्या तीन तेल कंपन्यांनी (OMCs) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीत मजबूत नफा कमावला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४,९१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 'पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील हाय मार्जिनमुळं कंपन्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत हा भरघोस नफा झाला आहे. तिसऱ्या तिमाहीतही हाच ट्रेंड तिसऱ्या तिमाहीत दिसून येईल, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळंच कंपन्या या महिन्याच्या अखेरीस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी करतील, अशी दाट शक्यता आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Ltd) ला जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५८२६.९६ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला. कच्च्या तेलाचे आटोक्यात असलेल्या किमती आणि वाढीव ग्रॉस रिफायनिंग मार्जिन (GRM) यामुळं नफ्यात ही वाढ झाली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Ltd) नं सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत ८,२४४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे.