Persistent Systems Dividend News : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगानं वाढणाऱ्या पर्सिस्टंट सिस्टीम्स या कंपनीनं आज डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीतील उत्साहवर्धक कामगिरीनंतर कंपनीनं भागधारकांना अंतरिम लाभांशाची भेट दिली आहे. कंपनीनं प्रत्येक शेअरमागे तब्बल २० रुपयांचा डिविडंड जाहीर केला आहे.
डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत (आर्थिक वर्ष २०२५) कंपनीच्या करोत्तर एकत्रित नफ्यात (PAT) ३०.३५ टक्क्यांनी वाढ झाली असून हा नफा ३७३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला २८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता, तर त्याआधीच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ३०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
२०२५ च्या आर्थिक वर्षातील डिसेंबरच्या तिमाहीत पर्सिस्टंट सिस्टिम्सचा कामकाजातून मिळणारा महसूल ३२.६ टक्क्यांनी वाढून ३,०६२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील २,४९८ कोटी रुपयांच्या तुलनेत महसुलाचा हा आकडा २२.६ टक्क्यांनी अधिक आहे. अनुक्रमिक महसुलातही ६ टक्क्यांनी सुधारणा झाली.
तिमाही ऑपरेटिंग नफा ५८० कोटी रुपये झाला आहे. तिमाही आधारावर यात २०.६ टक्के तर वार्षिक आधारावर यात ३१ टक्के वाढ नोंदविली गेली आहे, तर ऑपरेटिंग मार्जिन आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील १७ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १९ टक्क्यांपर्यंत सुधारलं आहे.
कंपनीच्या संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी ५ रुपयांच्या अंकित मूल्याच्या शेअरमागे २० रुपये अंतरिम लाभांश देण्यास मान्यता दिली. डिविडंडच्या पात्रतेसाठी रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
डिसेंबर तिमाहीच्या कामगिरीबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक संदीप कालरा यांनी समाधान व्यक्त केलं. 'आम्ही सलग १९ व्या तिमाहीत महसूल वाढीचं लक्ष्य साध्य केलं आहे. तिमाही आधारावर ते ४.३ टक्के तर, वार्षिक आधारावर १९.९ टक्के आहे. आमच्या एआय समर्थित प्लॅटफॉर्मच्या आधारे दिल्या जाणाऱ्या सेवेची ताकद यातून अधोरेखित झाली आहे.
'प्रतिष्ठेचा २०२४ आयएसजी स्टार ऑफ एक्सलन्स ऑवरऑल अवॉर्ड जिंकणे, एआयच्या माध्यमातून व्यवसायांची क्षमता वाढवणं यासह अनेक महत्त्वपूर्ण टप्पे आम्ही नुकत्याच संपलेल्या तिमाहीत साध्य केले आहेत, असं कालरा यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या