Vi share : व्होडाफोन आयडियाचा शेअर सलग दुसऱ्या दिवशी सुस्साट, ११ टक्क्याहून अधिक वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vi share : व्होडाफोन आयडियाचा शेअर सलग दुसऱ्या दिवशी सुस्साट, ११ टक्क्याहून अधिक वाढ

Vi share : व्होडाफोन आयडियाचा शेअर सलग दुसऱ्या दिवशी सुस्साट, ११ टक्क्याहून अधिक वाढ

HT Marathi Desk HT Marathi
Nov 27, 2024 03:41 PM IST

Vi share price : सरकारच्या घोषणेनंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअरला तरतरी आली असून ब्रोकरेजनंही शेअरचं रेटिंग बदललं आहे.

Vi share Price : व्होडाफोन आयडियाचा शेअर सलग दुसऱ्या दिवशी सुस्साट, ११ टक्क्याहून अधिक वाढ
Vi share Price : व्होडाफोन आयडियाचा शेअर सलग दुसऱ्या दिवशी सुस्साट, ११ टक्क्याहून अधिक वाढ

Vodafone India share Price Target : व्होडाफोन आयडियाचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. मात्र, मागच्या दोन दिवसांपासून कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी १५ टक्क्यांनी वधारलेल्या या शेअरनं आज पुन्हा १२ टक्क्यांची उसळी घेतली. या पार्श्वभूमीवर विदेशी ब्रोकरेज कंपनीनं शेअरच्या रेटिंगमध्ये बदल केला आहे. 

ऑस्ट्रेलियातील बहुराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनी मॅक्वायरीनं व्होडाफोन आयडियाच्या शेअरचं रेटिंग बदलून 'न्यूट्रल' केलं आहे. ब्रोकरेजची टार्गेट प्राइस ७ रुपये आहे. सध्याच्या बाजारभावापेक्षा ती कमी आहे. अलीकडच्या आठवड्यात ६० टक्क्यांची घसरण झाल्यानंतर हे शेअर्स खूप स्वस्त झाल्याचं मॅक्वेरीनं म्हटलं आहे. 

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे सरकारचा निर्णय प्रमुख कारण आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं २०२२ पूर्वी झालेल्या लिलावात खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी बँक गॅरंटी सादर करण्याची अट रद्द केली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडियाला त्यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. कारण कंपनीला ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ दरम्यान थकीत स्पेक्ट्रम देयकांपोटी २४,७४६.९ कोटी रुपयांची बँक गॅरंटी सादर करायची होती. त्यातून आता सुटका झाली आहे. व्होडाफोन आयडियाला सप्टेंबर २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ७,१७६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये गेल्या पाच दिवसांत १४ टक्के आणि एका महिन्यात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सहा महिन्यांत हा शेअर ४७ टक्के आणि या वर्षी आतापर्यंत ६० टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचा शेअर वर्षभरात ४० टक्क्यांनी घसरला आहे. दीर्घ मुदतीत हा शेअर ९० टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५५,२७१.९५ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner