share market news : जेमतेम दीड हजार कोटींचं भांडवली मूल्य असलेल्या रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड या चिमुकल्या कंपनीच्या शेअरमध्ये आज जोरदार तेजी दिसून आली. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेडचा शेअर ५.४ टक्क्यांनी वधारून १०.६५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी या तेजीला कारणीभूत ठरली आहे.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मिनर्वा व्हेंचर्स फंड आणि एबिसू ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंड यांनी राम स्टील ट्यूब्समध्ये नवीन हिस्सा खरेदी केला आहे. अमेरिकेतील एफआयआयनं रामा स्टीलचे १.५० कोटी शेअर्स १० रुपये प्रति दरानं खरेदी केले आहेत. तर एबिस्सू ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंडानं कंपनीचे ३ कोटी शेअर्स १० रुपये प्रति शेअर या दरानं खरेदी केले आहेत. याचाच अर्थ दोन्ही विदेशी संस्थांनी मिळून या पेनी स्टॉकमध्ये ४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीचा परिणाम शेअरच्या किंमतीवर झाला आहे. रमा स्टीलचा शेअर आज बीएसईवर १०.१० रुपयांवर उघडला आणि १०.६५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
रामा स्टील ट्यूब्सच्या संचालक मंडळानं अलीकडंच ‘राम डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रस्तावित नावानं संरक्षण क्षेत्राशी संबंधित पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ही नवी उपकंपनी संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करेल.
लेपाक्षी ट्यूब्स प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीच्या माध्यमातून आंध्र प्रदेशातील अनंतपूर इथं उत्पादन क्षमता वाढवून देशांतर्गत पोलादाच्या मागणीची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं कंपनीनं याआधीच जाहीर केलं आहे. रिअल इस्टेट, इन्फ्रा आणि ऑटोमोबाईल्स सारख्या पोलादाचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या क्षेत्रांमधून येणाऱ्या मागणीचा फायदा घेण्यासाठी कंपनी धोरणात्मकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील तेजी आणि कच्च्या मालाच्या कमी किंमतींमुळं या उद्योगाला सकारात्मक चालना मिळण्याची अपेक्षा आहे.