Share Market News : जोखीम घ्यायची क्षमता असेल आणि आपण निवडलेल्या स्टॉकवर विश्वास असेल तर छप्परफाड कमाई करून देणारी शेअर मार्केटसारखी दुसरी जागा नाही. राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअरनंही गुंतवणूकदारांना अशीच डोंगराएवढी कमाई करून दिली आहे. अवघ्या चार वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे.
कंपनीच्या शेअरमध्ये आजही जवळपास २ टक्क्यांची वाढ झाली आणि हा शेअर २४.६९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या चार वर्षांत राज रेयॉनच्या शेअरची किंमत अनेक पटींनी वाढली आहे. चार वर्षांत या शेअरनं २४,४७० टक्के परतावा दिला आहे.
१० ऑगस्ट २०२० रोजी या शेअरची किंमत १० पैसे होती आणि आजच्या तारखेला हा शेअर २४.५७ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारानं चार वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती रक्कम आज दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
राज रेयॉनच्या शेअरनं अल्पावधीत गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये सुमारे ४७ टक्के घसरण झाली आहे. मात्र, आठपैकी चार महिन्यांत तोटा सहन करूनही २०२४ मध्ये आतापर्यंत २८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जुलै महिन्यात ९ टक्क्यांहून अधिक वधारलेल्या शेअर्ससाठी ऑगस्ट महिना मजबूत होता. मात्र, त्याआधी जूनमध्ये हा चिमुकला शेअर (Penny Stock) ३ टक्क्यांनी तर मे महिन्यात ८ टक्क्यांनी घसरला होता. एप्रिल महिन्यात हा शेअर तब्बल ६ टक्क्यांनी वाढला होता. मार्चमधील १९ टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीनंतर ही वाढ झाली होती. याआधी जानेवारीत ४.४ टक्क्यांनी घसरलेल्या या शेअरमध्ये फेब्रुवारीमध्ये ४८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.
या मल्टीबॅगर शेअरनं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठली होती. हा उच्चांक ४५ रुपयांचा होता. हा शेअर सध्या २४ रुपयांवर ट्रेड करत आहे. ही किंमत उच्चांकी पातळीपासून ४६ टक्क्यांनी कमी आहे. परंतु या वर्षीच्या जानेवारीतील ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीपासून, म्हणजेच १५.०५ रुपयांवरून तो ६० टक्क्यांनी सावरला आहे.