lypsa gems jewellery share price : बाजार भांडवलाच्या बाबतीत अगदी छोट्या असलेल्या कंपन्यांकडं बहुधा गुंतवणूकदारांचं लक्ष जात नाही. अशा कंपन्या अचानक कधी तरी चर्चेत येतात व बाजार गाजवून जातात. लिप्सा जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेडचं सध्या असंच झालं आहे.
हा पेनी स्टॉक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोमवारी या कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी वधारून ९.९५ रुपयांवर पोहोचला. ही त्याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत आहे. या शेअरला सतत अप्पर सर्किट लागत आहे.
मागील व्यवहार सत्रात कंपनीचा शेअर जवळपास ७० टक्क्यांनी वधारला. पाच दिवसांपूर्वी लिप्सा जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेडचा शेअर सहा रुपयांना होता. या शेअरची ५२ आठवड्यांतील नीचांकी किंमत ४.६४ रुपये आहे. कंपनीचं बाजार भांडवल २९.३४ कोटी रुपये आहे. ही कंपनी कर्जमुक्त आहे हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यायला हवं.
तिमाही निकालानुसार, लिप्सा जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेडनं आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत १.४२ कोटी रुपयांचा महसूल नोंदविला आहे. ऑपरेटिंग नफा ०.१३ कोटी रुपये होता. निव्वळ नफा ०.०१ कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत ०.०७ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार प्रवर्तकांचा हिस्सा ३६.३७ टक्के आहे. या कंपनीत सार्वजनिक गुंतवणूकदारांचा ६३.३८ टक्के हिस्सा आहे, तर सरकारकडं ०.२४ टक्के म्हणजेच ७० हजार शेअर्स आहेत.
लिप्सा जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेड ही कंपनी १९९५ पासून हिरे व्यवसायात कार्यरत आहे. कच्च्या हिऱ्यांचं उत्पादन, प्रक्रिया आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची मार्केटिंग हे कंपनीचे तीन प्रमुख व्यवसाय आहेत. मुंबईतील अँटवर्प, दुबई आणि मॉस्को इथं कंपनीचे सहयोगी कंपन्या आहेत. लिप्साचे नवसारी आणि सूरसेज, सुरत इथं उत्पादन प्रकल्प आहेत. ही मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध हिरे कंपन्यांपैकी एक आहे.
पेनी स्टॉक्स हे खुल्या बाजारात व्यवहार करणाऱ्या छोट्या कंपन्यांचे शेअर्स असतात. या शेअर्सची किंमत सर्वसाधारणपणे ३० रुपयांपेक्षा कमी असते. कमी लिक्विडिटीमुळं पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं ठरू शकतं.