Penny Stock : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये भूकंप झाला. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २४०० अंकांनी घसरून ७८,६०० अंकांच्या खाली व्यवहार करताना दिसला. तर, निफ्टी ४९० अंकांनी घसरून २४,३०० अंकांवर आला. एकीकडं बाजाराची ही अशी घसरगुंडी सुरू असताना काही पेनी शेअर्स रॉकेटच्या वेगानं झेपावले. असाच एक चिमुकला शेअर म्हणजे मौरिया उद्योग लिमिटेडचा शेअर.
मौरिया उद्योग लिमिटेड या कंपनीचा शेअर शुक्रवारी १०.५० रुपयांवर बंद झाला होता. तर, सोमवारी या शेअरनं २० टक्क्यांचा अपर सर्किट गाठला आणि भाव १२.६० रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर १४.२५ रुपयांवर पोहोचला होता. २० मार्च २०२३ रोजी हा शेअर ७.६४ रुपयांवर होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे.
मौरिया उद्योग लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक १२ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे, अशी माहिती कंपनीनं मुंबई शेअर बाजाराला नुकतीच दिली आहे. या बैठकीत पहिल्या तिमाहीचे म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीचे आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत.
मौरिया उद्योग लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास प्रवर्तकांकडे ७३.९३ टक्के हिस्सा आहे. तर, सार्वजनिक भागधारकांकडे २६.०७ टक्के हिस्सा आहे. प्रवर्तकांमध्ये दीपा सुरेखा, दीपांशू सुरेखा, नवनीत सुरेखा यांचा समावेश आहे. त्यांच्याकडील हिस्सेदारी मोठी आहे.
मौर्य उद्योग लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, ही कंपनी एलपीजी सिलिंडर, व्हॉल्व्ह, रेगुलेटर आणि संबंधित अॅक्सेसरीजची भारतातील सर्वात मोठी उत्पादक आणि निर्यातदार आहे. एलपीजी सिलिंडरसाठी कंपनीचं वार्षिक उत्पादन सुमारे ४ दशलक्ष आणि व्हॉल्व्हसाठी ५ दशलक्ष आहे, तर रेगुलेटरसाठी ते सुमारे ४ दशलक्ष युनिट आहे.
भारताबाहेरही कंपनी आपला व्यवसाय करत आहे. कंपनीनं आपल्या उत्पादन युनिटमध्ये सुमारे ५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या मॅन्युफॅक्टरिंग युनिटमध्ये ९५० हून अधिक कामगार कार्यरत आहेत.