मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny stock news : दोन रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या या शेअरला LICसह अनेक बँकांची पसंती, तुम्हीही करू शकता विचार

Penny stock news : दोन रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या या शेअरला LICसह अनेक बँकांची पसंती, तुम्हीही करू शकता विचार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 09, 2024 06:44 PM IST

GTL Infrastructure News : गेल्या वर्षभरात दुप्पट परतावा देणारा जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. एलआयसीसह चार सरकारी बँकांकडं कंपनीचे शेअर आहेत.

दोन रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या या शेअरला LICसह अनेक बँकांची पसंती, एका वर्षात पैसे दुप्पट
दोन रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या या शेअरला LICसह अनेक बँकांची पसंती, एका वर्षात पैसे दुप्पट

Share Market News : मागील वर्षभरात भारतीय शेअर बाजारात काही पेनी स्टॉक्सनी (Penny Stocks) चमकदार कामगिरी केली आहे. त्यात GTL इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रमुख आहे. वर्षभराच्या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत ०.८५ रुपयांवरून १.८५ रुपयांपर्यंत वाढली आहे. याचाच अर्थ, या काळात कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना ११५ टक्के परतावा दिला आहे.

जीटीएल इन्फ्रावर सरकारी कंपन्यांनी दाखवलेला विश्वास हा गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळासह (LIC) अनेक सरकारी बँकांनी या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील कंपनीच्या शेअर होल्डिंगच्या पॅटर्नवर नजर टाकल्यास चित्र स्पष्ट होतं. 

एलआयसीसह विविध सरकारी बँकांची जीटीएलमध्ये किती गुंतवणूक आहे यावर एक नजर टाकूया…

LIC ची भागीदारी किती?

डिसेंबर २०२३ पर्यंतच्या शेअर होल्डिंगनुसार, एलआयसीची जीटीएल इन्फ्रामधील एकूण भागीदारी ३.३३ टक्के आहे. एलआयसीकडं जीटीएलचे ४२,६१,७७,०५८ शेअर्स आहेत. सप्टेंबर तिमाही ते डिसेंबर तिमाहीत या भागीदारीत कोणताही बदल झालेला नाही.

बँक ऑफ बडोदाची भागीदारी किती?

बँक ऑफ बडोदानंही जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बँक ऑफ बडोदाचा या कंपनीत एकूण हिस्सा ५.६८ टक्के आहे. त्यांच्याकडं बँकेचे ७२,७९.७४,९८१ शेअर्स आहेत. बँक ऑफ बडोदाच्या शेअर होल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

कॅनरा बँकेचीही जीटीएलमध्ये गुंतवणूक

कॅनरा बँकेकडं डिसेंबर २०२३ पर्यंत जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचे ५१,९१,१५,४२८ शेअर्स आहेत. ही भागीदारी ४.०५ टक्के इतकी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीपासून ते डिसेंबरपर्यंत बँकेनं जीटीएलच्या समभागांची विक्री किंवा खरेदी केलेली नाही.

सेंट्रल बँकेची ७ टक्क्यांहून अधिक भागीदारी

कंपनीच्या शेअर होल्डिंगनुसार सेंट्रल बँकेनंही या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीतील बँकेची भागीदारी ७.३६ टक्के आहे. म्हणजेच, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडं जीटीएलचे ९४,२१,५४,३७,६५ शेअर्स आहेत.

युनियन बँक ऑफ इंडियाचाही डाव

युनियन बँक ऑफ इंडियाची जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वाधिक भागीदारी आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत बँकेकडं जीटीएलचे १२.०७ टक्के शेअर होते. अर्थात, या बँकेकडं जीटीएलचे १,५४,६२,७१,५९९ शेअर्स होते.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel