मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IFCI share news : स्वस्तातल्या शेअरनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल, भाव अजूनही ५० रुपयांच्या आत

IFCI share news : स्वस्तातल्या शेअरनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल, भाव अजूनही ५० रुपयांच्या आत

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 18, 2024 06:44 PM IST

IFCI Share price : आयएफसीआय लिमिटेडच्या छोट्याशा शेअरनं अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकलं आहे.

स्वस्तातल्या शेअरनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल, भावही अजूनही ५० रुपयांच्या आत
स्वस्तातल्या शेअरनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल, भावही अजूनही ५० रुपयांच्या आत

share market news : शेअर बाजारातील गुंतवणुकीत जितकी जोखीम असते, त्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक ती पेनी स्टॉकमध्ये असते. मात्र, सखोल अभ्यास करून आणि सारासार विचार करून एखाद्या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास हा स्टॉक आपल्या गुंतवणुकीचं सोनं करू शकतो. 

आयएफसीआय लिमिटेड (IFCI Ltd)च्या शेअरनं गुंतवणूकदारांना असाच अनुभव दिला आहे. मागच्या चार वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांची झोळी भरून टाकली आहे. मार्च २०२० मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत ४ रुपये होती. तोच शेअर आता ३९ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. म्हणजेच या कालावधीत अल्पकालीन गुंतवणूकदारांना ८७५ टक्के नफा मिळाला आहे. उदाहरणच घ्यायचं झाल्यास, एखाद्या गुंतवणूकदारानं मार्च २०२० रोजी १० हजार रुपयांचे शेअर्स विकत घेतले असतील तर त्याचे पैसे आतापर्यंत ९७,५०० रुपयांपर्यंत पोहोचले असतील.

काय करते ही कंपनी?

IFCI लिमिटेड बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी ऊर्जा, अक्षय्य ऊर्जा, दूरसंचार, रस्ते, तेल आणि वायू, बंदरे, विमानतळ इत्यादींशी संबंधित सेवा पुरवते. कंपनी आपल्या ग्राहकांना स्टॉक ब्रोकिंगशी संबंधित सुविधा देखील प्रदान करते.

मागच्या वर्षभरात किती दिला परतावा?

मागच्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा शेअर सध्या ७१.७० रुपये प्रति शेअर या ५२ आठवड्यांच्या उच्च किंमतीपासून ४६ टक्के दूर आहे. तर, शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ९.०३ रुपये आहे. 

मार्च महिना कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी फारसा उत्साहवर्धक ठरलेला नाही. या काळात कंपनीच्या समभागांची किंमत १२.६ टक्क्यांनी घसरली आहे. तर, फेब्रुवारीमध्ये कंपनीनं अल्पकालीन गुंतवणूकदारांना १९.२६ टक्के परतावा दिला आहे. जानेवारी महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत ५.३ टक्क्यांनी वाढली आहे.

तिमाही वहीखाते किती मजबूत?

डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला १० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर, सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला ८३.७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल २१४.७० कोटी रुपये होता.

 

(Desclaimer: वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel