शेअरचा भाव दोन रुपयांपेक्षाही कमी असलेल्या कंपनीला झाला बक्कळ नफा, गुंतवणूकदार शांत कसे बसणार?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  शेअरचा भाव दोन रुपयांपेक्षाही कमी असलेल्या कंपनीला झाला बक्कळ नफा, गुंतवणूकदार शांत कसे बसणार?

शेअरचा भाव दोन रुपयांपेक्षाही कमी असलेल्या कंपनीला झाला बक्कळ नफा, गुंतवणूकदार शांत कसे बसणार?

Published Oct 24, 2024 01:33 PM IST

Penny Stock : जीजी इंजिनीअरिंग लिमिटेडचे शेअर आज चांगलेच चर्चेत होते. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यात तब्बल २० टक्क्यांची वाढ झाली.

शेअरचा भाव दोन रुपयांपेक्षाही कमी असलेल्या कंपनीला झाला बक्कळ नफा, लोक शांत कसे बसणार?
शेअरचा भाव दोन रुपयांपेक्षाही कमी असलेल्या कंपनीला झाला बक्कळ नफा, लोक शांत कसे बसणार?

Share market updates : अवघे ३०० कोटी मार्केट कॅप असलेल्या जीजी इंजिनीअरिंग कंपनीला दुसऱ्या तिमाहीत बक्कळ नफा झाल्याचे सकारात्मक पडसाद आज शेअर बाजारात उमटले. या कंपनीच्या शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आणि शेअर २० टक्क्यांनी वाढून १.९० रुपयांवर पोहोचला.

सप्टेंबर तिमाहीतील उत्साहवर्धक निकालांमुळं शेअर्समध्ये ही तेजी आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीजी इंजिनीअरिंगला ११ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला एक कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर, चालू वर्षीच्या मागील जून तिमाहीत २ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. त्या तुलनेत या तिमाहीत झालेला ११ कोटींचा नफा छप्परफाड आहे. हा नफा आर्थिक वर्ष २०२४ च्या ७ कोटी रुपयांच्या एकत्रित निव्वळ नफ्यापेक्षा जास्त आहे. 

महसुली उत्पन्न वाढलं!

कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत १०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तो ७३ कोटी रुपये होता. त्या तुलनेत हा महसूल ४५.२ टक्क्यांनी अधिक आहे. तर, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ७० कोटी रुपयांच्या तुलनेतही आताचा महसूल अधिक आहे. एबिटडा (earnings before interest, taxes, depreciation and amortization) १३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो केवळ १ कोटी रुपये होता.

मागील दीड वर्षापासून शेअरची वाटचाल सकारात्मक

एप्रिल २०२३ पासून कंपनीचे शेअर्स रिकव्हरी मोडमध्ये आहेत. या कालावधीत शेअर ०.७६ रुपयांवरून १.९० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच १५० टक्के वाढ झाली आहे. एकट्या नोव्हेंबर २०२३ मध्ये या शेअरमध्ये ८४ टक्के तेजी दिसून आली. या रिकव्हरीनंतरही हा शेअर जुलै २०२१ मध्ये गाठलेल्या ९.३३ रुपये प्रति शेअरच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीच्या जवळपास ८० टक्के खाली ट्रेड करत आहे. ही कंपनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत औद्योगिक इंजिन, मरीन इंजिन आणि डिझेल जनरेटर संचांसाठी सुटे भाग पुरवते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner