Stock Market News : रिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त मुकेश अंबानी यांच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. मात्र यापैकी अनेक कंपन्यांच्या शेअरची किंमत ५० रुपयांपेक्षा कमी आहे. डेन नेटवर्क्स लिमिटेड ही यापैकीच एक आहे. चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, १७ जानेवारी रोजी सेन्सेक्स घसरत असताना बाजारात या कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली.
शुक्रवारी डेन नेटवर्क्स लिमिटेडचा शेअर २.४६ टक्क्यांनी वधारला आणि ४०.४३ रुपयांवर पोहोचला. व्यवहारादरम्यान हा शेअर ४०.५५ रुपयांवर गेला. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६५.०३ रुपये आहे. तर, नीचांक ३९.४६ रुपये आहे. या वर्षी १४ जानेवारी रोजी हा शेअर ३२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ३९.४६ रुपयांवर पोहोचला होता. मात्र आज तो ४०.१४ रुपये आहे. ही किंमत पाहिल्यास हा शेअर पुन्हा एकदा रिकव्हरी मोडमध्ये आहे. परिणामी शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढल्याचं बोललं जातं.
केबल टीव्ही सेवा पुरवणाऱ्या डेन नेटवर्क्स लिमिटेडनं सोमवारी (१३ जानेवारी) रोजी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १४.६ टक्क्यांनी घसरून ४०.३ कोटी रुपयांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत डेन नेटवर्क्सनं ४७.२ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न ४.५ टक्क्यांनी घटून २६०.७ कोटी रुपयांवर आलं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते २७३ कोटी रुपये होतं.
ऑपरेशनल लेव्हलवर एबिटा (EBITDA) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ३२ टक्क्यांनी घसरून २७.६ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो ४०.६ कोटी रुपये होता. या तिमाहीत एबिटा मार्जिन १०.६ टक्के आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत १४.९ टक्के होतं.
संबंधित बातम्या