3P Land holdings share price : सरत्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजीचा माहोल होता. या तेजीच्या लाटेवर स्वार होत काही पेनी शेअर्सनी जोरदार परतावा दिला. थ्रीपी लँड होल्डिंग्स या कंपनीच्या शेअर्सवर अक्षरश: गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. हा शेअर एका क्षणाला २० टक्क्यांनी वधारला.
शुक्रवारी बाजार उघडला तेव्हा हा शेअर ५५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. तर, या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक १९.५१ रुपये आहे. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात हा शेअर १९.५१ रुपयांवर होता.
थ्रीपी लँड होल्डिंग्स कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ७३.३० टक्के आहे. तर, सर्वसाधारण भागधारकांकडे कंपनीचे २६.७० टक्के शेअर आहेत. प्रवर्तकांमध्ये अरुणकुमार महावीरप्रसाद जटिया आणि यशवर्धन जटिया यांचा समावेश आहे. त्यांच्याकडं ९,२९,१०० शेअर्स आहेत. त्याशिवाय, प्रवर्तकांमध्ये सुमा कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड, एएमजे लँड होल्डिंग्स लिमिटेड, फुजीसन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ठाकर अँड कंपनी लिमिटेड, केम मॅक प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
थ्रीपी लँड होल्डिंग्सचा एक आठवड्याचा परतावा ३७ टक्के आहे. तर, एक महिन्याचा परतावाही सुमारे ३५ टक्के आणि तीन महिन्यांचा परतावा ७७ टक्के आहे. वार्षिक आधारावर हा परतावा ९० टक्के आहे. एका वर्षाचा परतावा १५० टक्क्यांहून जास्त आहे.
3 पी लँड होल्डिंग्स लिमिटेडची स्थापना १९६५ मध्ये झाली होती. ही कंपनी कर्ज, गुंतवणूक उपक्रम आणि रिअल इस्टेट लीजिंगच्या व्यवसायात गुंतलेली आहे. रिअल इस्टेटच्या भाडेपट्ट्यातून कंपनीला उत्पन्न मिळते. निव्वळ नफा ४६ टक्क्यांनी वाढून ०.३८ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ९० टक्क्यांनी वाढून ०.८९ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विक्री ४१ टक्क्यांनी वाढून ३.५६ कोटी रुपये आणि नफा १८ टक्क्यांनी वाढून १.८१ कोटी रुपये झाला आहे.