पीसी ज्वेलर्सनं एका शेअरचं १० भागांत विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर शेअरमध्ये तुफानी तेजी आली आहे. आज, १ ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. सलग चौथ्या सत्रात या शेअरला अप्पर सर्किट लागलं आहे.
पीसी ज्वेलर्सच्या शेअरचा भाव आज १८४.७० रुपयांवर उघडला आणि पुढं तो वाढून १८६.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या संचालक मंडळानं ३० सप्टेंबर रोजी लिक्विडिटी वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करता यावेत म्हणून १:१० स्टॉक स्प्लिटला मान्यता देण्यात आली. ही माहिती कंपनीनं सोमवारी शेअर बाजाराला दिली.
कंपनीनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या निर्णयामुळं १० रुपयांच्या प्रत्येक पूर्ण पेड-अप इक्विटी शेअरचं प्रत्येकी १ रुपयांच्या १० शेअर्समध्ये विभाजन होईल. त्यामुळं एकूण शेअर्सची संख्या अंदाजे ४६.५ कोटींवरून ४६५.४ कोटींवर जाईल.
पीसी ज्वेलर्सच्या शेअरची किंमत गेल्या वर्षभरात ५६३.१२ टक्क्यांनी वाढली असून चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत २४६.४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या तीन आणि सहा महिन्यांत या शेअरनं अनुक्रमे २४१.६ टक्के आणि २२५ टक्के मल्टिबॅगर परतावा दिला आहे. सप्टेंबरमध्ये हा शेअर ६० टक्क्यांनी वधारला. मे २०१८ नंतर ३० सप्टेंबर रोजी तो उच्चांकी पातळीवर व्यवहार करत होता. १६ जानेवारी २०१८ रोजी या शेअरनं ६००.६५ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. बीएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार, कंपनीचं बाजार भांडवल ८,६९३.७४ कोटी रुपये आहे.
याशिवाय न्यू ट्रॅक गारमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बलराम गर्ग (एचयूएफ) या दोन प्रवर्तक समूहातील संस्थांना खासगी प्लेसमेंट तत्त्वावर ५६.२० रुपये प्रति वॉरंट या इश्यू प्राइसवर ११.५ कोटी पूर्ण परिवर्तनीय वॉरंट देण्यास बोर्डानं मान्यता दिली आहे. कंपनीच्या इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित होणाऱ्या या वॉरंट्समधून सुरुवातीच्या २५ टक्के सब्सक्रिप्शनसह ६४६ कोटी रुपये जमा होतील. उर्वरित ७५ टक्के रक्कम प्रवर्तकांनी इक्विटी शेअर्समध्ये पूर्ण रुपांतरित करण्यासाठी वाटपाच्या तारखेपासून १८ महिन्यांच्या आत भरणं आवश्यक आहे.