Stock Market Update Today : एलआयसीची मजबूत गुंतवणूक असलेला पीसी ज्वेलर्स लिमिटेडच्या शेअरला आज ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर स्प्लिट झाल्यामुळं तो खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शेअरचा भाव आज उसळला आणि हा शेअर १८.३५ रुपयांवर पोहोचला.
लिक्विडिटी सुधारण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कंपनीनं १०:१ या प्रमाणात शेअर स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला होता. स्प्लिटनंतर एका शेअरचं दहा भागांत विभाजन झालं असून त्याच प्रमाणात किंमत खाली आली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळानं २८ नोव्हेंबर २०२४ रोजी केलेल्या ठरावाद्वारे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याच्या उद्देशानं १६ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. प्रत्येकी १० रुपये अंकित मूल्य असलेल्या एका शेअरची १० इक्विटी शेअर्समध्ये उपविभागणी केली जाणार होती.
टी + १ सेटलमेंट सायकलमुळं विभाजनासाठी पात्र होण्यासाठी पीसी ज्वेलर्सचे समभाग खरेदी करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळं आज, १६ डिसेंबरला खरेदी केलेले शेअर्स स्प्लिटसाठी पात्र ठरणार नाहीत. मात्र तरीही हे शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक दिसले. त्यामुळं शेअरला अप्पर सर्किट लागलं.
पीसी ज्वेलर्सच्या शेअरनं २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करत २४७.१७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या आठवड्यात बीएसईवर हा शेअर १७४.८० रुपयांवर बंद झाला होता. हा भाव ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १८६.८० रुपयांपेक्षा किंचित खाली आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३२.२७ रुपयांपेक्षा बराच जास्त होता.
पीसी ज्वेलर्सनं 'नॉन-प्रमोटर, पब्लिक कॅटेगरी' अंतर्गत वर्गीकृत कर्जदारांच्या समूहाला प्रत्येकी १० रुपये अंकित मूल्याचे ५,१७,११,४६२ इक्विटी समभाग प्राधान्यानं जारी करण्यास मान्यता दिली आहे. यात एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या सारख्या प्रमुख बँकांचा समावेश आहे.
PC Jeweller Ltd ही भारतीय कंपनी आहे. ही कंपनी सोने, प्लॅटिनम, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची डिझाइनिंग, निर्मिती, विक्री या व्यवसायात आहे. कंपनीचे Azva, स्वर्ण धरोहर आणि लव्हगोल्ड असे नामांकित ब्रँड आहेत. ही कंपनी क्रिकेट विश्वचषकासाठी स्मृतीचिन्हे देखील तयार करते.
कंपनीचं मार्केट कॅप ८,५४८ कोटी रुपये आहे. नोव्हेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) या कंपनीत १.२६ टक्के हिस्सा आहे. या कंपनीच्या शेअरनं ३.२३ रुपये प्रति शेअर या ५२ आठवड्यांच्या नीचांकांवरून मोठी झेप घेत गुंतवणूकदारांना ४६९ टक्के असा दणदणीत परतावा दिला आहे.
संबंधित बातम्या