मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm Share Price : आरबीआयचा निर्बंधांचा दणका सहन होईना! पेटीएमच्या शेअरची घसरण सुरूच

Paytm Share Price : आरबीआयचा निर्बंधांचा दणका सहन होईना! पेटीएमच्या शेअरची घसरण सुरूच

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 06, 2024 11:13 AM IST

Paytm Share Price : मागील दोन दिवस लोअर सर्किट लागलेला पेटीएम कंपनीचा शेअर पुन्हा उभा राहण्यासाठी जोरदार संघर्ष करत आहे.

Paytm stock gains 5%
Paytm stock gains 5% (Bloomberg)

Paytm Share Price news Today : रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर लादलेल्या निर्बंधानंतर मोठ्या प्रमाणावर घसरलेला व लोअर सर्किटची नामुष्की ओढवलेला पेटीएमचा शेअर सावरण्यासाठी झगडत आहे. आज सकाळच्या सत्रात तब्बल ५ टक्क्यांनी वाढलेला हा शेअर काही तासांतच पुन्हा घसरला. यामुळं गुंतवणूकदारांमधील संभ्रम वाढला आहे.

आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी स्वीकारण्यावर आणि क्रेडिट व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळं पेटीएम सध्या अडचणीत आली आहे. पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी केलेल्या खुलाशानंतरही कंपनीला शेअर मार्केटमध्ये मोठा फटका बसला आहे.

मागच्या चार सत्रांमध्ये हा शेअर ४१ टक्क्यांनी घसरला होता. आज सकाळच्या सत्रात चित्र काहीसं पालटलेलं दिसलं. कालच्या ४३८ या किंमतीवरून हा शेअर सकाळी साडेनऊच्या सुमारास ४६६ रुपयांवर पोहोचला. मात्र, अवघ्या दीड तासांत पुन्हा कालच्याच पातळीवर आला आहे.

‘कॅट’चा व्यावसायिकांना सल्ला

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) या व्यापारी संघटनेनं व्यावसायिकांना पर्यायी पेमेंट अ‍ॅप्लिकेशन्सकडं वळण्याचं आवाहन केलं आहे. आपले पैसे सुरक्षित राहावेत व विनाअडथळा आर्थिक व्यवहार करता यावेत म्हणून ग्राहकांनी योग्य ती पावलं उचलावीत. लहान व्यापारी, विक्रेते, फेरीवाले आणि महिला मोठ्या संख्येनं पेटीएमद्वारे व्यवहार करतात. त्यामुळं पेटीएमवरील आरबीआयच्या निर्बंधांमुळं या लोकांना आर्थिक फटका बसू शकतो, असं 'कॅट'नं म्हटलं आहे.

विजय शेखर शर्मा म्हणाले…

पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केलं आहे. कंपनीचं व्यवस्थापन आरबीआयशी चर्चा करत आहे. त्यामुळं कंपनीत कोणत्याही प्रकारची नोकर कपात केली जाणार नाही. नेमकं काय चुकलं हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. लवकरच सर्व काही सुरळीत होईल. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी आरबीआयशी चर्चा सुरू आहे, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.

VI: अनलिमिटेड कॉलिंगसह भरमसाठ डेटा, ७० दिवसांपर्यत २०० हून अधिक चॅनल फ्री; व्हीआयचा भन्नाट प्लान

जिओ फायनान्शिलनं फेटाळलं टेकओवरचं वृत्त

आरबीआयच्या निर्बंधांनंतर अडचणीत आलेला पेटीएमचा वॉलेट व्यवसाय खरेदी करण्याचा विचार जिओ फायनान्शिल सर्व्हिसेस ही रिलायन्सची उपकंपनी करत असल्याचं वृत्त सर्वत्र पसरलं होतं. मात्र, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं हे वृत्त फेटाळलं आहे. अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

WhatsApp channel

विभाग