Stock Market Updates : पेटीएमच्या यूपीआय अॅप्लिकेशनमध्ये नवे युजर जोडण्याची परवानगी मिळाल्याच्या बातमीचे शेअर बाजारात सकारात्मक पडसाद उमटले आहेत. या बातमीनंतर पेटीएमचा शेअर वाऱ्याच्या वेगानं पळू लागला आहे. बुधवारी या शेअरच्या किंमतीत १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. एनएसईवर पेटीएमचा शेअर ७५६.५० रुपयांवर पोहोचला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला (PPBL) पेटीएम अॅपवर नवीन यूपीआय युजर्स जोडण्यास बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्यात आली आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियानं एनपीसीआयची प्रक्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वे आणि परिपत्रकांचं पालन करून कंपनीला नवीन युजर्स जोडण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सनं दिली आहे.
वन९७ कम्युनिकेशन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी १ ऑगस्ट रोजी बंदी उठवण्याची विनंती केली होती. त्यास एनपीसीआयनं सकारात्मक प्रतिसाद दिला. एनपीसीआयच्या मंजुरीमुळं पेटीएमला आपला युजर बेस वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पेटीएमनं आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीचं उत्पन्नही नोंदवलं आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सनं सप्टेंबर तिमाहीत ९३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, मनोरंजन तिकीट व्यवसायाच्या विक्रीतून १,३४५ कोटी रुपयांचा एकरकमी नफा झाला आहे. तिमाही-दर-तिमाही महसूल वाढीत ११ टक्के वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
प्रचंड गाजावाजा करून आलेल्या पेटीएमच्या आयपीओनं गुंतवणूकदारांची मोठी निराशा केली होती. बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून पेटीएमचा शेअर दिवसागणिक घसरत गेला. त्यामुळं जवळपास दोन वर्षे गुंतवणूकदार चांगलेच अडकले होते. त्यातच कंपनीवर एका पाठोपाठ एक निर्बंध आले. त्यामुळं गुंतवणूकदारांनी शेअरकडं पाठ फिरवली. मात्र, मागील सहा महिन्यांपासून पेटीएमच्या शेअरनं पुन्हा जोर धरला आहे. या कालावधीत पेटीएमनं गुंतवणूकदारांना ९७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, मागील एका महिन्यात शेअर १६ टक्क्यांनी वाढला आहे. आज ११.५० मिनिटांनी हा शेअर १०.६८ टक्क्यांनी वाढून ७५९.७५ रुपयांवर ट्रेड करत आहे.
संबंधित बातम्या