Paytm Share Price : अनेक अडथळ्यांवर मात करत पेटीएमच्या शेअरनं ओलांडला १००० चा टप्पा! ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm Share Price : अनेक अडथळ्यांवर मात करत पेटीएमच्या शेअरनं ओलांडला १००० चा टप्पा! ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला

Paytm Share Price : अनेक अडथळ्यांवर मात करत पेटीएमच्या शेअरनं ओलांडला १००० चा टप्पा! ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला

HT Marathi Desk HT Marathi
Dec 09, 2024 01:38 PM IST

Paytm Share Price Today : फिनटेक कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा शेअर सोमवारी ३ टक्क्यांनी वधारला, १,००७ रुपयांवर पोहोचला. पेपे कॉर्पमधील हिस्सा सॉफ्टबँकला विकण्याची घोषणा या वाढीमागे आहे.

अनेक अडथळ्यांवर मात करत पेटीएमच्या शेअरनं ओलांडला १ हजारचा टप्पा!
अनेक अडथळ्यांवर मात करत पेटीएमच्या शेअरनं ओलांडला १ हजारचा टप्पा!

Stock Market News Today : शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून तब्बल दोन वर्षे गुंतवणूकदारांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा शेअर पुन्हा सावरतो आहे. गेल्या काही दिवसांपासून वधारणाऱ्या या शेअरनं आज १ हजार रुपयांचा टप्पा ओलांडत ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.

आयपीओमध्ये २१५० किंमत असलेला पेटीएमचा शेअर मागच्या त्यानंतर उत्तरोत्तर गडगडत गेला. या वर्षीच्या मे महिन्यात शेअरनं ५२ आठवड्यांचा नीचांक नोंदवला. यावेळी तो ३१० रुपयांवर होता. त्यानंतरच्या ६ महिन्यात हा शेअर २२५ टक्क्यांनी वधारला आहे.

पेपे कॉर्पमधील हिस्सा सॉफ्टबँकेला विकण्याचा निर्णय पेटीएमच्या शेअरमधील या वाढीमागे आहे. वन९७ कम्युनिकेशन्स सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड या त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीच्या संचालक मंडळानं शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जपानच्या पेपे कॉर्पोरेशनमधील आपले सर्व स्टॉक अधिग्रहण हक्क (SAR) सॉफ्टबँक व्हिजन फंड २ कंपनीला ४१.९ अब्ज येन म्हणजेच २,३६४ कोटी रुपयांत विकण्याचा निर्णय घेतला आहे.

या करारानुसार पेपेचं मूल्य १.०६ ट्रिलियन जेपीवाय आहे, असं कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं आहे. पेटीएम सिंगापूरकडे असलेल्या पेपे एसएआरचं मूल्य ४१.९ अब्ज जेपीवाय निव्वळ उत्पन्न आहे. हा व्यवहार डिसेंबर २०२४ मध्ये पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

का करण्यात आला हा सौदा?

पेटीएम सिंगापूरनं एसएआरच्या विक्रीला मान्यता दिली आहे. एसएआरच्या विक्रीतून होणारा निव्वळ नफा वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या एकत्रित कॅश रिझर्व्हला आणखी बळकटी देईल आणि भागधारकांसाठी जास्तीत जास्त मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या भविष्यातील व्यावसायिक उपक्रमांना चालना देण्यास मदत करेल, असं कंपनीनं या करारामागील कारण सांगताना म्हटलं आहे.

सलग चौथ्या दिवशी शेअरमध्ये तेजी

पेटीएमच्या शेअरच्या किंमतीत सोमवारी सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आणि या कालावधीत ९.५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आजच्या तेजीमुळे शेअरनं १००० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि ५२ आठवड्यांचा उच्चांक ही गाठला. अर्थात, आजच्या सुरुवातीच्या तेजीनंतर हा शेअर घसरला. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास शेअर ९७३.६५ रुपयांवर व्यवहार करत होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मतं व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner