Paytm Share Price : शेअर बाजारात घसरण सुरू असताना पेटीएमची मूळ कंपनी - वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरवर शुक्रवारी गुंतवणूकदार तुटून पडले. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पेटीएमचा शेअर ७ टक्क्यांनी वधारला. यासह शेअरने ८०० रुपयांचा टप्पा ओलांडला. डिसेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यानंतर पहिल्यांदाच शेअरचा भाव ८०० रुपयांच्या पुढे गेला आहे. ८०० रुपयांचा टप्पा ओलांडण्यासाठी या शेअरला तब्बल ११ महिने लागले.
पेटीएमच्या शेअरनं ९ मे रोजी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला होता. हा शेअर ३१० रुपयांवर आला होता. त्या तुलनेत आता हा शेअर जवळपास १७५ टक्क्यांनी वधारला आहे. हा शेअर २३ नोव्हेंबर २०२३ रोजी च्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ९२६.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीपासून केवळ ८.५ टक्के दूर आहे. पेटीएमच्या शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यांत जवळपास ६७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सने चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ९२८.३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीला २९०.५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न ३४.१ टक्क्यांनी घटून १,६५९.५ कोटी रुपयांवर आले आहे. पेटीएमने दुसऱ्या तिमाहीत ९२८.३ कोटी रुपयांचा नफा कमावला. यात करमणूक तिकीट व्यवसायाच्या विक्रीतून १,३४५ कोटी रुपयांच्या नफ्याचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत कर्मचारी खर्चात कपात, विपणन खर्च आणि काही एकरकमी खर्च न झाल्याने कंपनीचा अप्रत्यक्ष खर्च १७ टक्क्यांनी घटून १०८० कोटी रुपयांवर आला आहे.
जिओजित फायनान्शियलनं पेटीएमच्या शेअरला ८५४ रुपयांचं टार्गेट ठेवताना रेटिंगही अपग्रेड केलं आहे. पेमेंट व्यवसायात नवीन भागीदारी, खर्चाचे नियोजन आणि ग्राहक पुन्हा वाढवण्यावर पेटीएमनं लक्ष केंद्रित केलं आहे. जिओजित यांच्या मते, सततच्या ऑटोमेशनमुळे कर्मचारी खर्च आणि मार्जिनमध्ये आणखी घट होण्याची अपेक्षा आहे, असं जिओजित फायनान्शिलयचं म्हणणं आहे. डोलत कॅपिटलनं शेअरवर ९६० रुपयांचं टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे.