Paytm Share Lower Circuit News : आयपीओ आल्यापासून गुंतवणूकदारांना रडवणारा पेटीएमचा शेअर धक्क्यावर धक्के देत आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यापासून हा शेअर सातत्यानं घसरत असून आज शेअरच्या भावानं आतापर्यंतच निचांक गाठला आहे. सलग तिसऱ्या सत्रात शेअरला लोअर सर्किट लागलं आहे.
पेटीएमचा शेअर आज एनएसईवर तब्बल १० टक्क्यांनी घसरला. सध्या शेअर ४३८.५० रुपयांवर ट्रेड करत असून हा ५२ आठवड्यांचा नीचांंक आहे. मागच्या अवघ्या तीन दिवसांत पेटीएमचे शेअर्स ७६४ रुपयांवरून ४३८.५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या २ सत्रांमध्ये त्यात सुमारे ४० टक्क्यांची घसरण झाली आहे.
कंपनीमध्ये कुठलीही टाळेबंदी होणार नाही, असं आश्वासन पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाची आरबीआयशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर भागीदारीसाठी इतर बँकांसोबतही चर्चा सुरू आहे. अनेक बँका पेटीएमला मदत करण्यास उत्सुक आहेत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असं शर्मा यांनी कर्चचाऱ्यांसोबत घेतलेल्या व्हर्चुअल टाऊन हॉल बैठकीत सांगितलं. मनी कंट्रोलनं या संदर्भातील उत्तर दिलं आहे.
पेटीएमनं २०२१ मध्ये आयपीओ आणला होता. त्या आयपीओतून २१५० रुपये प्रति शेअरप्रमाणे शेअर वितरित करण्यात आले होते. मात्र, आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांचं झालेलं नुकसान आजतगायत भरून आलेलं नाही. पेमेंट बँकेवर निर्बंध आल्यामुळं आता ३००-५०० कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. कंपनी अद्यापही तोट्यात आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा २२२ कोटी रुपये होता.
२९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारू नयेत असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेला दिले आहेत. यापूर्वी ११ मार्च २०२२ रोजी याच बँकेवर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.
पेटीएमच्या एकूण शेअर होल्डिंगमध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची भागीदारी १.८७ (३१ डिसेंबर २०२२) वरून ६.०७ (३१ डिसेंबर २०२३) पर्यंत वाढली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भागीदारी ७२.८ (३१ डिसेंबर २०२२) वरून ६३.७२ (३१ डिसेंबर २०२३) पर्यंत कमी झाला आहे. तर, इतर गुंतवणूकदारांची भागीदारी २५.३३ (३१ डिसेंबर २०२२) वरून ३०.२१ (३१ डिसेंबर २०२३) पर्यंत वाढली आहे.