Paytm share target Price : आयपीओ आल्यापासून गुंतवणूकदारांना अक्षरश: रडवणारा पेटीएमचा शेअर अनेक अडथळ्यानंतर पुन्हा तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा शेअर अक्षरश: सुस्साट सुटला असून तब्बल १७३ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळं एक्सपर्ट्सही त्यावर फिदा झाले आहेत.
पेटीएमचा शेअर आजही तेजीत होता. दिवसभरात आज त्यात १.६९ टक्क्यांची वाढ होऊन तो ९३४.५० रुपयांवर पोहोचला. गुरुवारी हा शेअर ९२७.५० रुपयांवर बंद झाला होता. तर, आजच्या व्यवहारात ९५० च्या पातळीवर पोहोचून या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांकही नोंदवला. पेटीएम शेअर्सच्या कामगिरीबाबतही तज्ज्ञ उत्साही आहेत. शेअरच्या टार्गेट प्राइसमध्ये तज्ज्ञांनी १०४ टक्क्यांनी वाढ केली आहे.
ब्रोकरेज हाऊस यूबीएसनं पेटीएमच्या टार्गेट प्राइसमध्ये १०४ टक्क्यांनी वाढ केली आहे. ब्रोकरेज हाऊसनं याआधी ४९० रुपयांचं टार्गेट प्राइस निश्चित केलं होतं. त्यात आता १००० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पेटीएमची टार्गेट प्राइस पूर्वीच्या तुलनेत १०४ टक्क्यांनी वाढली आहे. ब्रोकरेज हाऊस यूबीएसनं पेटीएमच्या शेअर्सवर 'न्यूट्रल' रेटिंग कायम ठेवलं आहे.
यूबीएसच्या म्हणण्यानुसार, पेटीएमच्या बाबतीत आधीच सुरू असलेल्या विविध अडचणी बऱ्यापैकी दूर झाल्या आहेत. आता कंपनीच्या व्यवसायावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. गेल्या ६ महिन्यांत पेटीएमच्या शेअरच्या किंमतीत १७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ३ महिने हा शेअर होल्ड करून ठेवला त्यांना ७२ टक्के नफा झाला आगे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३१० रुपये आहे.