मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm Share Price : पेटीएमच्या गुंतवणूकदारांना पुन्हा 'अच्छे दिन'; बाजार उघडताच शेअर उसळला

Paytm Share Price : पेटीएमच्या गुंतवणूकदारांना पुन्हा 'अच्छे दिन'; बाजार उघडताच शेअर उसळला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 19, 2024 11:52 AM IST

Paytm Share Price : पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंधानंतर तळाला गेलेला पेटीएम कंपनीचा शेअर पुन्हा उसळला आहे.

Paytm Payments Bank
Paytm Payments Bank (REUTERS)

Paytm Share Price :  आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर लादलेल्या निर्बंधांनंतर आजवरचा नीचांक गाठणारा पेटीएमचा शेअर पुन्हा उसळला असून या शेअर अप्पर सर्किट लागलं आहे. यामागे तीन कारणं असल्याचं सांगितलं जातं.

पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादल्यानंतर व्यवहार थांबवण्यासाठी आरबीआयनं दिलेली मुदत वाढवली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेतील नोडल खाती ॲक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली आहेत. तिसरं कारण म्हणजे ईडीनं पेटीएम पेमेंट्स बँकेला क्लीन चिट दिली आहे.

‘द हिंदू’नं दिलेल्या वृत्तानुसार, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडनं परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही, असं ईडीला आढळून आलं आहे.

६०० रुपयांवर जाऊ शकतो पेटीएमचा शेअर

'बर्नस्टीन'च्या अहवालानुसार कंपनीच्या शेअर्सची किंमत ६०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ब्रोकरेज हाऊसनं ॲक्सिस बँकेच्या निर्णयानंतर पेटीएमच्या शेअरची टार्गेट प्राइस वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर, १ फेब्रुवारी रोजी पेटीएमच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांनी घसरण झाली. त्या दिवशी कंपनीच्या शेअर्सची किंमत ७६१ रुपयांवरून घसरून ६०८.८० रुपयांच्या पातळीवर बंद झाली. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार सुरूच राहिले. एक वेळी अशी आली की पेटीएमच्या शेअर्सची किंमत ३१८.३५ रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

ॲक्सिस बँकेशी टाय अप

पेटीएमची पॅरेंट कंपनी असलेली फिनटेक फर्म One97 कम्युनिकेशन्सनं आपले नोडल (मुख्य) खाती ॲक्सिस बँकेत हलवली आहेत. कंपनीनं शुक्रवारी सायंकाळी शेअर बाजाराला याची माहिती दिली. पेटीएमची नोडल खाती ही मास्टर खात्यासारखी असतात. यात सर्व ग्राहकांचे, व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्ण केले जातात. १५ मार्चनंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यांमध्ये ठेवी आणि व्यवहार थांबवण्याच्या आरबीआयच्या निर्देशानंतर कंपनीनं हे पाऊल उचललं आहे.

पेटीएम वादावर केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईच्या निमित्तानं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. कायद्याचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नियमांचं पालन हे 'ऐच्छिक' असू शकत नाही. प्रत्येक उद्योजकानं याकडं बारकाईनं लक्ष द्यायला हवं, असं राजीव चंद्रशेकर यांनी म्हटलं आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग