Paytm Payments Bank board rejig : स्थापनेनंतर अल्पावधीतच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आणि तितक्याच वेगानं आर्थिक अडचणीत सापडलेल्या पेटीएम कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी आज पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला.
पेटीएमची मूळ कंपनी ‘वन९७ कम्युनिकेशन्स’नं सोमवारी स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली. लवकरच नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, निवृत्त आयएएस अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोककुमार गर्ग आणि निवृत्त आयएएस रजनी सेखरी सिब्बल हे स्वतंत्र संचालक म्हणून बँकेच्या संचालक मंडळात सहभागी होणार आहेत. याशिवाय, संचालक मंडळात पंजाब अँड सिंध बँकेचे माजी कार्यकारी संचालक अरविंद कुमार जैन (स्वतंत्र संचालक) आणि पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांचा समावेश आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेला आरबीआयच्या कारवाईचा सामना करावा लागत असताना विजय शेखर शर्मा यांनी राजीनामा आला आहे. पेटीएम ब्रँडची पितृ कंपनी असलेल्या One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची पेटीएम पेमेंट्स बँकेत ४९ टक्के भागीदारी आहे. विजय शेखर शर्मा हे पेटीएम पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष होते.
पेटीएमच्या शेअर्समध्ये आज पाच टक्क्यांनी वाढ झाली. NSE आणि BSE दोन्ही एक्स्चेंजवर शेअर प्रत्येकी ५ टक्क्यांनी वाढला. पेटीएमचा शेअर एनएसईवर ४२८.१० रुपयांवर पोहोचला, तर बीएसईवर ४२७.९५ रुपयांवर पोहोचला. शेअरला आज अप्पर सर्किट लागलं. याआधी शुक्रवारी देखील ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं होतं.
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, पेटीएम कंपनी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) साठी देशातील अनेक मोठ्या बँकांशी बोलणी करत आहे. यामध्ये ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक यांचा समावेश आहे.
श्रीनिवासन श्रीधर हे ४० वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते ज्युबिलंट फार्मोव्हा इथं स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल हाऊसिंग बँकेत त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत.
पेटीएम पेमेंट्स बँकेचे दुसरे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती झालेले देवेंद्रनाथ सारंगी हे तामिळनाडू कॅडरचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. सार्वजनिक प्रशासन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा त्यांना मोठा अनुभव आहे. ते सध्या सदर्न पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड आणि व्होल्टास लिमिटेड सह अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत.