Paytm Share Price : पेटीएमचा तोटा घटला! मार्केट एक्सपर्ट्स आशावादी; शेअरचं टार्गेट वाढवलं!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm Share Price : पेटीएमचा तोटा घटला! मार्केट एक्सपर्ट्स आशावादी; शेअरचं टार्गेट वाढवलं!

Paytm Share Price : पेटीएमचा तोटा घटला! मार्केट एक्सपर्ट्स आशावादी; शेअरचं टार्गेट वाढवलं!

Jan 20, 2025 05:59 PM IST

Paytm Q3 Results : पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा तोटा कमी झाल्यामुळं तज्ज्ञांनी या शेअरवर विश्वास व्यक्त करत टार्गेट वाढवलं आहे.

Paytm Share Price : पेटीएम पुन्हा उभारी घेतेय! तोटा घडल्यानं शेअरचे भाव वाढण्याचा अंदाज
Paytm Share Price : पेटीएम पुन्हा उभारी घेतेय! तोटा घडल्यानं शेअरचे भाव वाढण्याचा अंदाज

Share Market News : आयपीओ आल्यापासून गुंतवणूकदारांना हादरवून सोडणारी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स पुन्हा उभारी घेतेय. पेटीएमनं चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचा निकाल आज जाहीर केला असून कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा घटून २०८.३ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २१९.८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामुळं तज्ज्ञांनी शेअरवर विश्वास व्यक्त असून शेअरचा भाव १२५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियलनं पेटीएमच्या शेअरचा पुन्हा एकदा बारकाईनं अभ्यास आणि पाठपुरावा सुरू केला आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्सना बाय रेटिंग दिलं आहे. जेएम फायनान्शिअलनं कंपनीच्या शेअर्ससाठी १२५० रुपयांचं लक्ष्य ठेवलं आहे.

खर्च आटोक्यात आणण्यात यश

चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत पेटीएमचा एकत्रित महसूल ३६ टक्क्यांनी घसरून १,८२८ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचं उत्पन्न २८५१ कोटी रुपये होतं. कंपनीच्या उत्पन्नात तिमाही आधारावर १० टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ तिमाहीत पेटीएमनं आपला खर्च ३१ टक्क्यांनी कमी करून २,२१९ कोटींवर आणला आहे.

सहा महिन्यात शेअरमध्ये ९८ टक्के वाढ

पेटीएमच्या शेअरमध्ये एनएसईवर गेल्या सहा महिन्यांत सुमारे ९८ टक्क्यांची अधिक वाढ झाली आहे. २१ जुलै २०२४ रोजी पेटीएमचा शेअर ४५३ रुपयांवर होता, तोच आज २० जानेवारी २०२५ रोजी ८९४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ३ महिन्यांत पेटीएमच्या शेअरमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०६३ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३१० रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner