मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm layoffs news : पेटीएममधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; मोठी कपात होण्याची शक्यता

Paytm layoffs news : पेटीएममधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; मोठी कपात होण्याची शक्यता

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 14, 2024 03:43 PM IST

Paytm Layoffs news : आरबीआयच्या निर्बंधांमुळं संकटांचा सामना करणाऱ्या पेटीएममध्ये नोकरकपात केली जाण्याची शक्यता आहे.

पेटीएममधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; मोठी कपात होण्याची शक्यता
पेटीएममधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; मोठी कपात होण्याची शक्यता (REUTERS)

Paytm Layoffs news : पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं (RBI) घातलेल्या निर्बंधांचा फटका पेटीएमच्या ग्राहकांनंतर आता कर्मचाऱ्यांनाही बसण्याची चिन्हं आहेत. वार्षिक कामगिरीच्या आढाव्यानंतर कंपनीच्या वेगवेगळ्या विभागात नोकरकपात केली जाण्याची शक्यता आहे.

मनी कंट्रोलनं या संदर्भात वृत्त दिलं आहे. नेमक्या किती लोकांच्या नोकऱ्या जाणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. परंतु कंपनीतील काही विभागांना त्यांच्या टीममध्ये २० टक्के कपात करण्यास सांगण्यात आल्याचं समजतं. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वीच कपातीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पेटीएमचं म्हणणं काय?

पेटीएमच्या प्रवक्त्यानं या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, सध्या वार्षिक मूल्यमापन सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी कपात होऊ शकते. मात्र, याला थेट नोकरकपात असं म्हणू नये. ही नित्याची प्रक्रिया असून नोकरकपात ही कामगिरीवर आधारित असेल. प्रत्येक कंपनी ही पद्धत अवलंबते. मात्र, त्यांनी कर्मचारी कपातीचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे.

कर्मचारी काय म्हणतात?

पेटीएममधील संभाव्य कपातीच्या वृत्तामुळं कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. टीमची पुनर्रचना करण्याचे आदेश व्यवस्थापनानं दिले आहेत. ही पुनर्रचना कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या एचआरकडून लोकांना एकामागून एक राजीनामा देण्यास सांगितलं जात आहे, अशी माहिती एका कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. दैनंदिन कामकाजासाठी पेटीएमनं एआय आधारित स्वयंचलित यंत्रणांचा वापर सुरू केला आहे.

WhatsApp channel

विभाग