Paytm Pocket Soundbox : दुकानात किंवा फेरीवाल्यांकडं काहीही खरेदी करून डिजिटल पेमेंट केल्यानंतर अमूक-तमूक एवढे पैसे मिळाल्याची माहिती गोड आवाजात मिळते. दुकानदारांकडं असलेलं साउंडबॉक्स हा व्यवहार झाल्याचं गिऱ्हाइक आणि दुकानदाराला सांगतं. हे साउंडबॉक्स आता अधिक अद्ययावत आणि नव्या स्वरूपात उपलब्ध झालं आहे. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन ९७ कम्युनिकेशननं खिशात मावेल आणि सहज हाताळता येईल अशी साउंडबॉक्स बाजारात आणली आहेत.
पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्स आणि पेटीएम म्युझिक साऊंडबॉक्स अशी ही डिव्हायसेस आहेत. हे दोन्ही साउंडबॉक्स ४ जी तंत्रज्ञानानं युक्त अशी आहेत. हे साऊंडबॉक्स डेबिट कार्डच्या आकाराचे असून खिशात सहज बसू शकतात. सतत कामात असलेल्या व्यापाऱ्यांना पेमेंटचे ऑडिओ पेमेंट्स ताबडतोब देण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतात. या साऊंडबॉक्समध्ये पाच दिवस टिकणारी बॅटरी, ४जी कनेक्टीव्हीटी आणि अंधारातही स्पष्ट दिसेल अशा क्षमतेचा टॉर्चलाइट आहे.
पेटीएम म्युझिक साऊंडबॉक्समध्ये असलेला स्पीकर पेमेंटबाबत नोटिफिकेशन्स देतो आणि ब्ल्यूटूथच्या माध्यमातून गाणी ऐकण्यासाठी फोनशी देखील कनेक्ट करता येऊ शकतो. या म्युझिक साऊंडबॉक्समध्ये ७ दिवसांपर्यंत टिकणारी दर्जेदार बॅटरी, ४ जी कनेक्टीव्हिटी आणि ४ वॅट क्षमतेचा स्पीकर आहे. तसंच, वॉइस ओव्हरची देखील सुविधा आहे. या सुविधेमुळं गाणं सुरू असतानाही व्यापाऱ्यांना पेमेंट नोटिफिकेशन्स ऐकता येणार आहे.
पेटीएमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी नव्या डिव्हायसेसच्या संदर्भात माहिती दिली. 'पेटीएम साऊंडबॉक्ससह इन-स्टोअर पेमेंट्समध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्स व पेटीएम म्युझिक साऊंडबॉक्स ही नाविन्य आणि कल्पकतेचं प्रतीक आहेत. व्यापाऱ्यांचं व छोट्या व्यावसायिकांचं काम अधिक सुलभ व्हावं या उद्देशानं ही डिव्हाइस तयार करण्यात आली आहेत. पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्स व पेमेंट अलर्ट्सह मनोरंजन करणारे म्युझिक साऊंडबॉक्स हे गेमचेंजर ठरतील, असा विश्वास विजय शेखर शर्मा यांनी व्यक्त केला.