योगगुरू रामदेव बाबा यांच्या मालकीची कंपनी असलेल्या पतंजली फूड्स लिमिटेडने बाजारातून ४ टन लाल मिरची पावडर परत मागवली आहे. पतंजली कंपनीने अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे डबाबंद लाल मिरची पावडरची विशिष्ट खेप परत मागविण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) ने कंपनीला दिले आहेत.
याबाबत बोलताना पतंजली फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अस्थाना म्हणाले, ‘पतंजली फूड्सद्वारे विकण्यात येत असलेल्या २०० ग्रॅम वजनाचे पॅकेट असलेल्या मिरची पावडरच्या पॅकेटच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यात कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे चार टन लाल मिरची पावडर बाजारातून परत मागवण्यात आली आहे. FSSAI द्वारे लाल मिरची पावडरसह विविध खाद्यपदार्थांसाठी कीटकनाशक अवशेष कमाल मर्यादा निश्चित केली जाते. कंपनीने निर्दिष्ट केलेल्या नियामक निकषांच्या अनुषंगाने आपल्या वितरकांना सूचित करत त्वरित पावले उचलली आहेत. उत्पादन खरेदी केलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातीही देण्यात आल्या आहेत.’
ग्राहकांनी पतंजली फूड्सचे २०० ग्रॅमचे मिरची पावडरचे पॅकेट ज्या दुकानांमधून खरेदी केले असतील त्या ठिकाणी जाऊन परत करावे आणि संपूर्ण पैसे परत घ्यावे, असे आवाहन पतंजली कंपनीतर्फे करण्यात आले असल्याचे अस्थाना म्हणाले. दरम्यान, पतंजली कंपनी आपल्या कृषी मालाच्या उत्पादन पुरवठादारांचे मूल्यांकन करत असल्याचे अस्थाना यांनी सांगितले. त्याचबरोबर कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी कडक गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया अवलंबण्यासाठी आणि एफएसएसएआयच्या नियमांचे पूर्णपणे पालन सुनिश्चित करण्यासाठी कंपनीतर्फे पावले उचलली जात असल्याचे अस्थाना म्हणाले.
योग क्षेत्रात कार्यरत असलेले बाबा रामदेव यांनी १९८६ साली पतंजली आयुर्वेद कंपनीची स्थापना केली होती. सध्या पतंजली कंपनी ही दैनंदिन वापराच्या घरगुती वस्तू (एफएमसीजी) बनवणाऱ्या देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी ही एक आहे. पतंजली फूड्सद्वारे निर्मित नूडल्स तयार करण्याचे लायसन्स नसताना त्याची निर्मिती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, कंपनीने या आरोपांचे खंडन केले होते.
संबंधित बातम्या