IPO Listing News Today : एसएमई स्टॉक परमेश्वर मेटलनं शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री केली आहे. आयपीओमध्ये ६१ रुपये किंमत असेलला या कंपनीचा शेअर आज ८४.५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यामुळं गुंतवणूकदारांना तब्बल ३८.५२ टक्के नफा झाला आहे.
परमेश्वर मेटल कंपनीचा आयपीओ २ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. तो ६ जानेवारीपर्यंत खुला राहिला. परमेश्वर मेटलच्या आयपीओचा एकूण आकार २४.७४ कोटी रुपयांपर्यंत होता.
लिस्टिंगनंतरही शेअर तेजीत असून परमेश्वर मेटलच्या शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं असून हा शेअर ८८.७२ रुपयांवर पोहोचला आहे. आयपीओ येण्याआधी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९६.३३ टक्के होता, तो आता ७०.८१ टक्क्यांवर आला आहे. आयपीओतून मिळणाऱ्या रकमेचा वापर दहेगाम इथं नवीन उत्पादन युनिट उभारण्यासाठी, तांबे वितळविण्यासाठी भट्टी नुतनीकरणासाठी केला जाणार आहे. तसंच, कार्यशील भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे.
मेटलचा आयपीओ एकूण ६०७.०७ पट सब्सक्राइब झाला होता. रिटेल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीत कंपनीचा आयपीओ ५९७.०९ पट तर, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत १२०२.८३ पट सबस्क्राइब झाला. परमेश्वर मेटलच्या आयपीओ क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीत १७७.३२ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ एका लॉटसाठी गुंतवणूक करता आली होती. एका लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १,२२,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
कंपनीचा परमेश्वर मेटल ही कंपनी ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झाला होती. ही कंपनी तांब्याच्या भंगाराच्या पुनर्वापराद्वारे तांब्याची तार आणि रॉड तयार करते. कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट गुजरातमधील दहेगाम इथं आहे. परमेश्वर मेटल आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणित आहे. कंपनीची उत्पादनं पॉवर केबल, वायर मेकिंग, ट्रान्सफॉर्मर आणि ऑटोमोटिव्ह उद्योगात वापरली जातात.
संबंधित बातम्या