Share Market News : संरक्षण क्षेत्रातील चर्चित कंपनी असलेल्या पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या शेअर्सच्या किंमतीत आज ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली.
महाराष्ट्र सरकारसोबत झालेल्या करारानुसार कंपनीला नवी मुंबईत ऑप्टिक्स पार्कचं काम मिळालं आहे. २०२८ पर्यंत हे पार्क कार्यान्वित होणं अपेक्षित आहे. कंपनीला सरकारकडून जमीन आणि अनुदान मिळणार आहे. त्यानंतर कंपनीला पुढील १० वर्षांत १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
कंपनीचा शेअर आज बीएसईवर १०६० रुपयांच्या पातळीवर उघडला. काही वेळानं सकाळी कंपनीच्या शेअरचा भाव ६.७४ टक्क्यांपेक्षा जास्त वधारला. सकाळी ११.५५ वाजता कंपनीचा शेअर ११०२.०५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये कंपनीला इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटला (IRDE) ६१.४३ कोटी रुपयांचं काम मिळालं होतं. संरक्षण मंत्रालयाकडून हे काम देण्यात आलं आहे.
गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळाले असले तरी आज डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. परंतु गेल्या सहा महिन्यांत हा शेअर १९ टक्क्यांनी घसरला आहे. सर्व चढ-उतार असूनही गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १५९२.७५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६०८.७५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४३०० कोटी रुपये आहे. गेल्या २ वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये ९२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या