paramount communications share price : १०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पॅरामाउंट कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये आज सुमारे १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसईमध्ये एका क्षणी कंपनीच्या शेअर्सचा भाव ८१.५४ रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. या कंपनीकडं ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑर्डर आहेत.
मंगळवारच्या बंदच्या तुलनेत बुधवारी कंपनीचा शेअर ७७ रुपयांवर उघडला. हा शेअर दिवसभरात ११.८९ टक्क्यांनी वधारून ८१.५४ रुपयांवर पोहोचला आहे. हा दिवसभरातील उच्चांक आहे. हा उच्चांक गाठल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्येही काही प्रमाणात घसरण दिसून आली. पॅरामाउंट कम्युनिकेशन्सच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांक ११६.७० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४७ रुपये प्रति शेअर आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर ५६.३० टक्के वाढ झाली होती. जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत कंपनीचा नफा ११३.७० कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २९.४९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
पॅरामाउंट कम्युनिकेशन्स लिमिटेड केबल आणि वायर तयार करते. यामध्ये पॉवर केबल, टेलिकॉम केबल, रेल्वे केबल आणि स्पेशलाइज्ड केबलचा समावेश आहे. सेल, इंडिया हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, बीएसएनएल, टाटा स्टील, भारतीय रेल्वे हे पॅरामाउंट कम्युनिकेशन्सचे ग्राहक आहेत.
कंपनीकडं ४९५ कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत. मात्र कंपनीवर ८६.२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होईल अशी अपेक्षा आहे. पॅरामाउंट कम्युनिकेशन्सचं बाजारमूल्य २.४१ हजार कोटी आहे. मागील ५ वर्षांत कंपनीनं गुंतवणूकदारांना ७०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, मागील वर्षात ६६ टक्के परतावा दिला आहे.