Pan Aadhaar Linking alert : मे महिना संपत आला आहे. अजूनही तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलेलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आधार-पॅन लिंक करण्यासाठी प्राप्तिकर विभागानं करदात्यांना ३१ मे पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत आधार-पॅन लिंक न केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या पगारावर होऊ शकतो.
प्राप्तिकराच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीचा परमानंट अकाऊंट नंबर (PAN) बायोमेट्रिक आधारशी जोडलेला नसेल, तर सध्या लागू असलेल्या दराच्या दुप्पट दरानं त्या व्यक्तीचा TDS कापला जाणार आहे. तसं होऊ द्यायचं नसेल तर पुढच्या तीन दिवसांत तुम्हाला आधार-पॅन लिंक करावं लागणार आहे.
प्राप्तिकर विभागानं गेल्या महिन्यात एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार ३१ मेच्या आत पॅन आधारशी लिंक केल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तसं केलं नसल्यास आर्थिक फटका बसू शकतो. अजूनही तीन दिवस हातात आहेत. त्या वेळेत काम करून घ्या, अशी सूचना प्राप्तिकर विभागानं मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' च्या माध्यमातून दिली आहे.
प्राप्तिकर विभागानं (Income Tax Department) बँका व फॉरेक्स डीलर्ससह अहवाल देणाऱ्या संस्थांना दंड टाळण्यासाठी ३१ मे पर्यंत SFT दाखल करण्यास सांगितलं आहे. SFT (विशिष्ट आर्थिक व्यवहारांचं विवरण) दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२४ आहे. SFT अचूक आणि वेळेवर दाखल करून दंड टाळा, अशी सूचना प्राप्तिकर विभागानं आणखी एका पोस्टद्वारे दिली आहे.
परकीय चलन डीलर्स, बँका, सब-रजिस्ट्रार, NBFC, पोस्ट ऑफिस, बाँड/डिबेंचर जारीकर्ते, म्युच्युअल फंड ट्रस्टी, लाभांश देणाऱ्या किंवा शेअर्स खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी कर अधिकाऱ्यांकडं SFT रिटर्न भरणं आवश्यक आहे. SFT रिटर्न भरण्यास उशीर झाल्यास प्रत्येक 'डिफॉल्ट' दिवसासाठी १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. SFT न भरल्यास किंवा चुकीचा तपशील भरल्यास दंडही लागू केला जाऊ शकतो. प्राप्तिकर विभाग एखाद्या व्यक्तीनं SFT द्वारे केलेल्या मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा मागोवा ठेवतो.