पी एन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ आला! अर्ज करावा का? एक्सपर्ट्स काय म्हणतात पाहा!-p n gadgil jewellers ipo opens apply or not gmp subscription status and more ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  पी एन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ आला! अर्ज करावा का? एक्सपर्ट्स काय म्हणतात पाहा!

पी एन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ आला! अर्ज करावा का? एक्सपर्ट्स काय म्हणतात पाहा!

Sep 10, 2024 12:01 PM IST

P N Gadgil Jewellers IPO : पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सनं ११०० कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ आणला असून येत्या १२ सप्टेंबरपर्यंत तो गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. यात गुंतवणूक करावी का? जाणून घेऊया…

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ आला! अर्ज करावा का? एक्सपर्ट्स काय म्हणतात पाहा!
पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ आला! अर्ज करावा का? एक्सपर्ट्स काय म्हणतात पाहा! (Pixabay)

Share Market News Today : दागिने उद्योगातील आघाडीचं नाव असलेल्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडचा आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. हा आयपीओ १२ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार आहे. किरकोळ गुंतवणुकदारांना आयपीओमध्ये किमान ३१ शेअर्स मिळणार असून प्रति शेअर ४५६ ते ४८० रुपयांचा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

आयपीओच्या माध्यमातून १,१०० कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. यात एकूण ८५० कोटी रुपये किंमतीचे शेअर नव्यानं विक्रीस काढण्यात आले आहेत. तर, प्रवर्तक एसव्हीजी बिझनेस ट्रस्टकडून २५० कोटींच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर देण्यात आली आहे. आयपीओमध्ये ५० टक्के समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIB), १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना (NII) आणि ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना देण्यात आले आहेत. जमा झालेल्या निधीचा वापर महाराष्ट्रात १२ नवीन स्टोअर्स सुरू करणे, व्यावसायिक हेतूंसाठी विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल.

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वीएडलवाइज सिक्युरिटीज लिमिटेड) आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुकरनिंग लीड मॅनेजर आहेत.

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स करते काय?

ही कंपनी महाराष्ट्रातील दागिने क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. बीआयएस-नोंदणीकृत दागिन्यांच्या दुकानांसाठी भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. स्टोअरच्या संख्येच्या बाबतीत हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्यापारी आहेत.

'पीएनजी' ब्रँड हा ऐतिहासिक 'पी. एन. गाडगीळ' ब्रँडचा विस्तार आहे. १८३२ पासूनचा समृद्ध वारसा या कंपनीला लाभला आहे. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड ज्वेलरीची वैविध्यता ही कंपनी ग्राहकांना देते. पी. एन. गाडगीळ यांनी प्री-डिझाईन कलेक्शनसोबतच कस्टम मेड ज्वेलरीचे पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत.

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सध्या महाराष्ट्र आणि गोव्यात ३९ स्टोअर्स असून एक स्टोअर अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथं आहे. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत महाराष्ट्रात १२ नवीन स्टोअर्ससह विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.

आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या महसुलात ५४.६३ टक्के सीएजीआरची वाढ झाली आहे. भारतातील प्रमुख कंपन्यांपैकी सर्वात वेगानं वाढणारा ज्वेलरी ब्रँड म्हणून 'पी एन गाडगीळ' ओळखला जातो. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०२२ मधील २५,५५६ दशलक्ष रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६१,१०९ दशलक्ष रुपयांपर्यंत वाढला आहे.

ग्रे मार्केटमध्ये काय आहे स्थिती?

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ जीएमपी किंवा ग्रे मार्केट प्रीमियम +२३० आहे. अर्थात, या शेअरचा भाव ग्रे मार्केटमध्ये २३० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत असल्याची माहिती investorgain.com नं दिली आहे. आयपीओ प्राइस बँडचा वरचा टप्पा आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या शेअर्सची अंदाजित लिस्टिंग किंमत ७१० रुपये आहे. आयपीओच्या मूळ किमतीपेक्षा (४८० रुपये) ही किंमत ४७.९२ टक्के अधिक आहे.

कधी होणार लिस्टिंग?

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओचं वाटप शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी होईल. आयपीओ न लागलेल्या गुंतवणूकदारांना १६ व १७ सप्टेंबर रोजी रिफंड मिळेल. त्याच दिवशी शेअर्स अलॉटीजच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. हा शेअर बुधवार, १८ सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

आयपीओसाठी अर्ज करावा का?

वेंचुरा सिक्युरिटीज आणि देवेन चोक्सी या दोघांनीही पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओला 'सबस्क्राइब' रेटिंग दिलं आहे. सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या जोरदार मागणीमुळं कंपनीच्या वाढीबद्दल देवेन चोक्सी यांनी आशा व्यक्त केली आहे. संघटित रिटेल क्षेत्रातील विक्री वाढ, डिस्पोजेबल उत्पन्न वाढविणे आणि ब्रँडेड दागिन्यांवर भर यामुळं सध्याच्या वाढीच्या ट्रेंडचा फायदा होईल, असंही चोक्सी यांनी म्हटलं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील तज्ज्ञांच्या शिफारशी व मतं त्यांची वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

 

Whats_app_banner
विभाग