Business Ideas : स्तुतीमुळे हुरळू नये आणि टिकेमुळे बिथरू नये हाच खरा उद्योगमंत्र
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : स्तुतीमुळे हुरळू नये आणि टिकेमुळे बिथरू नये हाच खरा उद्योगमंत्र

Business Ideas : स्तुतीमुळे हुरळू नये आणि टिकेमुळे बिथरू नये हाच खरा उद्योगमंत्र

HT Marathi Desk HT Marathi
Jan 08, 2025 04:27 PM IST

नोकरी-धंदा किंवा संसारात कुणीही अहंकार जोपासून चालत नाही. क्षुल्लक मतभेदापोटी तरुण दांपत्ये थेट घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतात. नोकरदार कर्मचारी ताण- तणावाखाली वावरतात. समंजस सहजीवनापेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा प्रबळ होतात तेव्हा अशा समस्या निर्माण होतात.

उद्योगमंत्रः स्तुतीमुळे हुरळून जाऊ नये
उद्योगमंत्रः स्तुतीमुळे हुरळून जाऊ नये

 

धनंजय दातार

अलिकडेच एक जुना मित्र भेटला. विचारपूस करताना मला आठवले, की त्याचा मुलगा लग्नाचा आहे आणि गेले वर्ष-दीड वर्ष त्याच्यासाठी सुयोग्य स्थळ शोधण्याची मोहीम सुरु आहे. मी सहजच विचारले, ‘काय कुठवर प्रगती? सध्या चहा-पोह्याचे कार्यक्रम जोरात सुरु असतील ना? तयारीत राहा बरं. एकदा का लगीनघाई सुरु झाली, की तुम्हाला उसंत मिळणार नाही.’ त्यावर तो गंभीरपणे म्हणाला, ‘अरे जय! कसले आलेत चहा-पोह्याचे कार्यक्रम? सध्या बायोडेटा वाचूनच परस्परांना नकार कळवण्याची फॅशन आलीय. त्यातून नवी पिढी हट्टी आणि जास्तच प्रॅक्टिकल आहे बघ.’ माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहून तो पुढे म्हणाला, ‘हल्लीच्या पिढीतील विवाहेच्छुक मुला-मुलींच्या अपेक्षाच मॅच होत नाहीयेत. गेल्याच महिन्यात माझ्या मुलाला एक मुलगी सांगून आली होती, पण तिने बायोडेटा वाचल्यानंतर मुलाचे वार्षिक उत्पन्न स्वतःपेक्षाही कमी असल्याने विचार करता येत नाही, असा मेसेज पाठवून पुढे जाण्यास नकार दिला. त्यावर आमच्याही चिरंजीवांचा स्वाभिमान डिवचला गेला. त्याने तिला रिप्लाय पाठवला, की तुझे शिक्षण माझ्यापेक्षा कमी असल्याने मीच नकार देण्याच्या विचारात होतो, पण तू प्रथम निर्णय कळवून माझे काम सोपे केलेस. काय म्हणावे याला? कसले हे यांचे अभिमान म्हणायचे?’ 

मित्राच्या बोलण्यातील अभिमान हा शब्द ऐकताना मला ‘अभिमान’ या हिंदी चित्रपटाची आठवण आली. नात्यापेक्षा अभिमान महत्त्वाचा नसतो, हा खूप छान संदेश त्या चित्रपटातून दिला गेला होता. पत्नी गायनात आपल्यापेक्षाही अधिक लोकप्रियता मिळवत असल्याचे बघून अभिमान दुखावलेला नवरा तिच्यापासून मनाने दूर जाऊ लागतो. या धक्क्याने त्यांच्या संसारवेलीवरील अंकुर उमलण्याआधीच खुडला जातो. खोट्या अभिमानापायी आपण पत्नी आणि संसाराला गमावू, हे उमगल्याने तो पती वेळेवर भानावर येतो, अशी त्या चित्रपटाची कथा होती. 

अशीच, पण उलट कथा मी एका व्यावसायिकाच्या आयुष्यात घडलेली पाहिली आहे. तो स्वतः कमी शिकलेला होता, पण कष्ट व अनुभवाच्या जोरावर त्याने स्वतःचा धंदा भरभराटीला आणला होता. त्याला पत्नी चांगली उच्चशिक्षीत मिळाली. आपल्याकडे फारसे शिक्षण नाही, पण निदान पत्नीला तरी तिचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने या बिझनेसमनने पत्नीला स्वतःच्या व्यवसायात आणले. तिनेही त्याचा विश्वास सार्थ ठरवत कौतुकास्पद काम करुन दाखवले. पण या गोष्टीत अभिमानाने पत्नीच्या मनात प्रवेश केला. कामाच्या ठिकाणी सर्वजण या बाईंची ‘मॅडम! तुम्ही किती कर्तबगार आहात,’ अशी प्रशंसा करु लागले. यशस्वी व्यक्तीच्या जवळ चमच्यांचे कोंडाळे जमा व्हायला वेळ लागत नाही. फ्लॅटरी स्पीक्स बिफोर युअर फेस, अशी इंग्रजी म्हण आहे. त्याप्रमाणे स्तुतिपाठकांनी हरभऱ्याच्या झाडावर चढवल्याने या बाईसाहेब हुरळून गेल्या. हळूहळू त्या स्वतःच्या नवऱ्याचाही अपमान करु लागल्या. आपला नवरा कमी शिकलेला असला तरी त्याचा बिझनेसमधला अनुभव दांडगा आहे आणि त्यानेच आपल्याला या व्यवसायात आणून कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली आहे, हे त्या विसरल्या. पतीने सुरवातीला पत्नीचे हे बदललेले वागणे आणि टोमणे दुर्लक्षित केले पण कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांपुढे झालेले अपमान त्या नवऱ्याच्या जिव्हारी लागले. त्याचा अभिमान दुखावला गेला आणि त्यातून दोघांचे जोडीदारांचे नाते खराब झाले. 

पत्नीची समंजस साथ मिळण्याबाबत मी मात्र नशीबवान ठरलो आहे. मीसुद्धा माझ्या पत्नीच्या कर्तबगारीला वाव देण्याच्या हेतूने तिला आमच्या व्यवसायात आणले होते. पण वर उल्लेखलेली कथा आमच्या जीवनात घडू शकली नाही. याचे कारण म्हणजे आमचा एकमेकांवरील अपार विश्वास आणि परस्परांप्रती आदर. घर आणि व्यवसाय अशा दोन्ही आघाड्यांवर तिने आपल्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. गरीबी ते श्रीमंती हा प्रवास हातात हात घालून केला असल्याने आम्हाला आव्हानात्मक काळातील कष्टांची जाणीव आहे. 

मित्रांनोऽ पती असो, की पत्नी, परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा हाच त्यांच्या संसाराचा पाया असला पाहिजे, कारण आपल्या दुरभिमानाची झळ प्रथम जोडीदाराला बसत असते. संसारात अहंकार कुरवाळत बसण्यापेक्षा ‘तरीही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का,’ असे आर्जव असले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे कुणाच्याही स्तुतीमुळे हुरळू नये आणि टिकेमुळे बिथरु नये. नोकरी-व्यवसायातही हीच गोष्ट ध्यानात धरावी. 

हरिपाठातील संत एकनाथांचा एक अभंग खूप समर्पक आहे.

नको नको मान। नको अभिमान।

सोडी मीतूंपण। तोचि सुखी॥

 

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

Whats_app_banner