IPO Listing Today : आयटी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या ओरिएंट टेक्नॉलॉजीज या कंपनीनं शेअर बाजारात धडाकेबाज एन्ट्री घेतली आहे. जोरदार लिस्टिंगनंतर ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
आयपीओमध्ये ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची किंमत २०६ रुपये होती. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा आयपीओ २१ ऑगस्ट २०२४ रोजी खुला झाला होता आणि २३ ऑगस्टपर्यंत सबस्क्रीप्शनसाठी खुला होता.
कंपनीच्या शेअर्सनं पहिल्या दिवशी ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला. आयपीओमध्ये ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत २०६ रुपये होती. ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा शेअर बुधवारी मुंबई शेअर बाजारात ४०.७ टक्क्यांच्या प्रीमियमसह २९० रुपयांवर सूचीबद्ध झाला. लिस्टिंगनंतर लगेचच बीएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३०४.४५ रुपयांवर पोहोचला. तर, एनएसईवर ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा शेअर ३९.८१ टक्के प्रीमियमसह २८८ रुपयांवर लिस्ट झाला आहे. जोरदार लिस्टिंगनंतर एनएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वाढून ३०२.४० रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनीचा आयपीओ एकूण १५४.८४ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ६८.९३ पट सब्सक्राइब झाला होता. तर, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीत ३१०.०३ पट हिस्सा दिसून आला. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) कोटा १८८.७९ पट सब्सक्राइब झाला होता.
ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करता येणार होता. आयपीओच्या एका लॉटमध्ये ७२ शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये किमान १४८३२ रुपयांची गुंतवणूक करावी लागली. ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा एकूण पब्लिक इश्यू आकार २१४.७६ कोटी रुपये आहे. आयपीओच्या आधी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९७.९६ टक्के होता. आता तो ७३.२१ टक्के झाला आहे.