Orient Green Share Price News : स्मॉलकॅप कंपनी असलेल्या ओरिएंट ग्रीन पॉवरच्या शेअर्सच्या भावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं तेजी दिसत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा शेअर जवळपास १० टक्क्यांनी वाढून १४.३७ रुपयांवर पोहोचला आहे. ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
ओरिएंटच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ७.७० रुपये आहे. आताचा भाव या किंमतीच्या दुप्पट आहे. सरकारी विमा कंपनी LIC नं ओरिएंट ग्रीन पॉवरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. एलआयसीनं ओरिएंट ग्रीन पॉवरचे १ कोटींहून अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांची नजर या शेअरवर खिळली आहे.
ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मागच्या ४ महिन्यांत ८५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २९ मार्च २०२३ रोजी हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर ७.७८ रुपयांवर ट्रेड करत होता. आज, म्हणजेच ३१ जुलै २०२३ रोजी कंपनीच्या शेअरचा भाव BSE वर १४.३७ रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या महिनाभरात ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीचे शेअर २५ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप १०७० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
एप्रिल-जून तिमाहीच्या ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सरकारी विमा कंपनी एलआयसीकडं कंपनीचे १ कोटी ५४ लाख ५९ हजार ३०६ शेअर्स आहेत. ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीमध्ये LIC चा वाटा २.०६ टक्के आहे. जानेवारी-मार्च २०२३ या तिमाहीतही LIC कडे कंपनीत तितकेच समभाग होते. याचाच अर्थ, एलआयसीचा या कंपनीवरील विश्वास कायम आहे.
ओरिएंट ग्रीन पॉवर ही ४०० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमता असलेली स्वतंत्र वीज उत्पादक कंपनी आहे. राइट्स इश्यूद्वारे आणखी निधी उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या निधीचा उपयोग कर्जाचा भार कमी करण्यासाठी आणि नुतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात कंपनीच्या भविष्यातील विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी केला जाणार आहे.
(डिस्क्लेमर : ही माहिती कंपनीच्या शेअर बाजारातील कामगिरीवर आधारित आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमध्ये जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)