मुंबई : रिलायन्स हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स गेल्या आठवडाभरापासून सातत्याने वरच्या सर्किटमध्ये आहेत. कंपनीचा शेअर आज इंट्राडे मध्ये 5 टक्क्यांनी वधारून 5.27 रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरमध्ये जवळपास २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड प्रकरणात जनरल पर्पज कॉर्पोरेट लोन मंजूर करताना योग्य प्रक्रिया न पाळल्याबद्दल सेबीने अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल अंबानी यांना सोमवारी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, रिलायन्स हाऊसिंग फायनान्सच्या शेअरमध्ये सातत्याने अपर सर्किट असूनही या कारवाईचा शेअरवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही.
ऑगस्ट मध्ये सेबीने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या निधीच्या गैरव्यवहारप्रकरणी अनिल अंबानी आणि इतर २४ जणांवर सिक्युरिटीज मार्केटमधून पाच वर्षांची बंदी घातली होती. त्याला २५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
रिलायन्स हाऊसिंग फायनान्सचा शेअर वर्षभरात १९० टक्क्यांनी वधारला आहे. या दरम्यान याची किंमत 1.85 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली आहे. गेल्या पाच दिवसांत हा शेअर २२ टक्के, सहा महिन्यांत २५ टक्के आणि यंदा आतापर्यंत २० टक्क्यांनी वधारला आहे. मात्र, दीर्घ मुदतीत त्यात झपाट्याने घट झाली आहे. 22 सप्टेंबर 2017 रोजी या शेअरची किंमत 107 रुपये होती. म्हणजेच त्यानंतर तो ९५ टक्क्यांपर्यंत तुटला आहे. एलआयसीचा कंपनीत १.५४ टक्के हिस्सा आहे.