Onion price news : नवरात्रीचे उपवासाचे दिवस संपताच कांद्यानं पुन्हा एकदा रडवायला सुरुवात केली आहे. मागच्या दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यातील बहुतेक शहरांमध्ये कांद्याच्या भावानं अर्धशतकी मजल मारली आहे. त्यामुळं गृहिणींची चिंता वाढली आहे.
काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या महागाईनं सर्वसामान्यांना अक्षरश: मेटाकुटीला आणलं होतं. टोमॅटोचा भाव स्थिरावल्यानंतर कांद्याच्या भावानं उचल खाल्ली. नवरात्रीच्या दिवसात कांदा खाणं टाळलं जातं. बहुतेक हिंदू कुटुंबांमध्ये या ९ दिवसांत जेवणात लसूण आणि कांदा वापरला जात नाही. तसंच, मांस-मच्छी खाल्ली जात नाही. त्यामुळं कांद्याचा वापर कमी होतो. त्यामुळं नवरात्रीच्या आधी कांद्याचा भाव काहीसा खाली आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा कांद्याचा भाव वधारू लागला आहे. त्यामुळं साठेबाजी वाढून भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत कांद्याचा भाव किलोमागे ४५ ते ५५ रुपयांदरम्यान आहे. वर्धा शहरात हाच भाव ६० रुपये आहे. कोल्हापूर शहरात कांदा प्रतिकिलो ४० रुपयांपर्यंत विकला जात आहे. एका वेळी तीन किलो घेतल्यास किलोमागे ३५ रुपये मोजावे लागत आहेत. तर, पुण्यात कांदा प्रति किलो ४५ रुपयांना विकला जात आहे.
केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील (https://consumeraffairs.nic.in) ताज्या आकडेवारीनुसार, कांद्याची किरकोळ किंमत किलोमागे जास्तीत जास्त ७० रुपये तर, कमीत कमी १७ रुपये आहे. राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांदा ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. मात्र, दिल्ली, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये कांद्याची सरासरी किंमत ४० रुपये आहे. ईशान्येकडील नागालँड आणि सिक्कीममध्ये ५० रुपये आणि मिझोराम आणि अंदमानमध्ये ५५ रुपयांवर पोहोचला आहे.
राजस्थानमध्ये कांद्याची सरासरी किंमत सुमारे २७ रुपये होती. गुजरातमध्ये सरासरी ३१ रुपये, बिहारमध्ये ३२ रुपये आणि झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या किरकोळ बाजारात कांदा ३३ रुपये दराने विकला जात आहे. तेलंगण आणि चंदीगडमध्ये एक किलो कांद्याचा भाव ३४ रुपये, तर छत्तीसगड आणि हरियाणामध्ये ३५ रुपये किलो दराने मिळत आहे.
संबंधित बातम्या