Olectra greentech : एका वर्षात चार पटींनी वाढला हा शेअर; तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी झुंबड-olectra greentech shares rise 13 on strong q1 earnings up 720 in 5 years ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Olectra greentech : एका वर्षात चार पटींनी वाढला हा शेअर; तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी झुंबड

Olectra greentech : एका वर्षात चार पटींनी वाढला हा शेअर; तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी झुंबड

Aug 13, 2024 05:33 PM IST

Olectra Greentech share price : इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या तिमाही निकालानंतर शेअरमध्ये प्रचंड तेजी आली आहे. मागच्या एका वर्षात या कंपनीचा शेअर चौपटीनं वाढला आहे.

एका वर्षात चार पटींनी वाढला हा शेअर; तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी झुंबड
एका वर्षात चार पटींनी वाढला हा शेअर; तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी झुंबड

Olectra greentech Q1 results : देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेकचे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निकालांना गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा मोठा फायदा कंपनीच्या शेअरला झाला आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा शेअर आज १३ टक्क्यांनी वधारला आणि १,७४२ रुपयांवर पोहोचला आहे.

ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या महसुलात जून तिमाहीत ४५.३७ टक्के आणि निव्वळ नफ्यात ३३ टक्के वाढ झाली आहे. कंपनीला कामकाजातून मिळणारं एकत्रित उत्पन्न ४५.३७ टक्क्यांनी वाढून ३१४ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. एबिटडा (Earnings Before Tax and Depreciation) देखील वार्षिक १० टक्क्यानं वाढून ४४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. करोत्तर निव्वळ नफा २४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा १८ कोटी रुपये होता. त्यात यावेळी ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

काय करते ही कंपनी?

सुमारे १३,७८८ कोटी रुपयांचं बाजार भांडवल असलेली स्मॉल कॅप कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक एमईआयएल समूहाचा भाग आहे आणि इलेक्ट्रिक बसची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. हैदराबादमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी इलेक्ट्रिक बस उत्पादनात देशातील अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या इलेक्ट्रिक बसचे विविध मॉडेल्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

शेअरमध्ये पाच वर्षांत ७२० टक्के वाढ

गेल्या तीन वर्षांत या शेअरमध्ये ४३६ टक्के वाढ झाली असून गेल्या पाच वर्षांत ७२० टक्के परतावा मिळाला आहे. देशातील विविध राज्यांतील सरकारं सार्वजनिक वाहतुकीसाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडं वळत आहेत. या संधीचा फायदा घेऊन ओलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी विविध राज्य परिवहन उपक्रमांनी सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेत सहभागी होत आहे.

कंपनीनं मिळवली अनेक कंत्राटं

मार्च महिन्यात कंपनीनं आसाम राज्य परिवहन महामंडळाकडून १० इलेक्ट्रिक बससाठी १५.१४ कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली होती. तेलंगण राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (TSRTC) ५५० बसेस, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमासाठी (बेस्ट) २,१०० बसेस आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (एमएसआरटीसी) ५,१५० बसेससह महत्त्वपूर्ण कंत्राटे नुकतीच मिळाली आहेत. ओलेक्ट्रा सध्या सुरू असलेल्या अनेक निविदांमध्ये भाग घेत आहे. त्यामुळं आणखी ऑर्डर मिळण्याची आशा आहे. 

वाढीची मोठी क्षमता

मॅन्युफॅक्चरिंग आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला आधार देऊन ईव्ही इकोसिस्टमचा विस्तार करण्यावर भारत सरकारनं लक्ष केंद्रित केल्यानं या उद्योगाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या एकूण बस ताफ्यात इलेक्ट्रिक बसचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळं या क्षेत्रात लक्षणीय वाढीची क्षमता आहे.

कंपनीच्या महसुलात १२ टक्के योगदान देणारा ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा इन्सुलेटर विभाग वाढीसाठी अनुकूल स्थितीत आहे. भारताची इलेक्ट्रिक इन्सुलेटर बाजारपेठ २०२८ पर्यंत ५५७.४ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. येत्या पाच वर्षात ती ६.६ टक्के सीएजीआरनं वाढणं अपेक्षित आहे. वीज वितरण क्षेत्राचं खासगीकरण आणि त्यानंतर पारेषण व वितरण, पायाभूत सुविधांचा विस्तार यामुळं बाजारपेठेला आणखी चालना मिळाली आहे. इन्सुलेटर हा या नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असल्यानं, त्यांची वाढलेली मागणी ओलेक्ट्राला फायदेशीर ठरणार आहे.

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

विभाग