Ola Share price : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समधील घसरण थांबण्याचं नावच घेत नाहीए. गेल्या काही दिवसांपासून होत असलेली ही घसरगुंडी आजही कायम राहिली. लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच आज हा शेअर ९० रुपयांच्या खाली घसरला आणि ८९.५५ रुपये प्रति शेअरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
ओला इलेक्ट्रिकचा शेअर नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या शेअरचं स्वागतही चांगलं झालं. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर हा शेअर १५७.४० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत त्यात ४३ टक्क्यांची घसरण झाली आहे. बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्स सारख्या दिग्गजांशी करावी लागणारी स्पर्धा हे त्याचं प्रमुख कारण मानलं जात आहे. या दोन्ही कंपन्या सुस्साट सुटल्यानं ओलाचा ईव्ही बाजारपेठेतील हिस्सा सातत्यानं घसरत चालला आहे.
सप्टेंबर महिन्यात ओला कंपनीनं वर्षातील सर्वात कमी मासिक विक्रीची नोंद केली आहे. या महिन्यात केवळ २३,९६५ वाहनांची विक्री झाली आहे. ऑगस्टमध्ये वाहनांच्या विक्रीतील घसरण २६,९२८ पर्यंत खाली आली होती. त्यात आता वाढ झाली आहे.
स्पर्धक कंपन्या ओलाच्याच किंमतीत स्कूटर्सचे नवनवे मॉडेल्स बाजारात आणत आहेत. याशिवाय, कंपनीच्या स्वत:च्या सर्व्हिस नेटवर्कमध्ये येणारे अडथळेही विक्रीतील घसरणीला कारणीभूत ठरत आहेत.
आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या सात महिन्यांत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं सरासरी ३७,६९५ युनिट्सची मासिक विक्री केली. मात्र, ऑगस्टमध्ये विक्रीत घसरण सुरू झाली आणि ती सप्टेंबरमध्ये कायम राहिली. यामुळं कंपनीच्या वार्षिक वाढीतही घसरण झाली आहे. ती घसरण जूनमध्ये १०५ टक्के आणि जुलैमध्ये ११२ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ४६ टक्के आणि सप्टेंबरमध्ये २९ टक्के अशी आहे.
सप्टेंबरमध्ये बजाज ऑटोनं इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून १८,९३३ बजाज चेतकची विक्री केली आहे आणि टीव्हीएस आयक्यूब्सला मागे टाकलं आहे. विक्रीत सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम ओलाच्या मार्केट शेअरवरही झाला आहे. कंपनीचा मार्केटमधील हिस्सा ऑगस्टमधील ३१ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये २७ टक्क्यांवर आला आहे. मार्च आणि जुलै २०२४ मध्ये कंपनीचा मार्केट शेअर ३८ टक्के होता.
भारतातील इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) बाजारपेठ अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून वाढत्या स्पर्धेमुळं ओला इलेक्ट्रिकच्या मार्केट शेअरवर परिणाम होऊ शकतो, असं देशांतर्गत ब्रोकरेज फर्म अॅम्बिट कॅपिटलनं म्हटलं आहे. ओलाचा बाजारहिस्सा आर्थिक वर्ष २०२४ मधील ३५ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत २७.५ टक्क्यांपर्यंत कमी होईल आणि आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत २५ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा अंदाज अॅम्बिटनं वर्तविला आहे. ही आव्हानं असतानाही एका कॅलेंडर वर्षात ३ लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा ओलांडणारी ओला ही पहिली भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ठरली आहे.