Ola Electric Share Price : वाऱ्याच्या वेगानं धावतोय ओला इलेक्ट्रिकचा शेअर; तज्ज्ञांनी दिला गुंतवणूकदारांना 'हा' सल्ला-ola electric shares hit 20 pc upper circuit investors became rich ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ola Electric Share Price : वाऱ्याच्या वेगानं धावतोय ओला इलेक्ट्रिकचा शेअर; तज्ज्ञांनी दिला गुंतवणूकदारांना 'हा' सल्ला

Ola Electric Share Price : वाऱ्याच्या वेगानं धावतोय ओला इलेक्ट्रिकचा शेअर; तज्ज्ञांनी दिला गुंतवणूकदारांना 'हा' सल्ला

Aug 12, 2024 12:03 PM IST

ola electric share price : मागील आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या ओला इलेक्ट्रिकचा शेअर वाऱ्याच्या वेगानं धावत आहे.

ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये वादळी तेजी; तज्ज्ञांनी दिला गुंतवणूकदारांना 'हा' सल्ला
ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये वादळी तेजी; तज्ज्ञांनी दिला गुंतवणूकदारांना 'हा' सल्ला

ola electric share price : काही दिवसांपूर्वीच शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. ओलाचे शेअर्स आज २० टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचले आहेत. हा शेअर १०९.४४ रुपयांवर पोहोचला आहे. सलग दुसऱ्या सत्रात ही वाढ कायम राहिली. याआधी ९ ऑगस्ट रोजी प्रथमच अप्पर सर्किट बसल्यानंतर शेअरमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली होती.

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी सूचीबद्ध झाले. लिस्टिंगला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, लिस्टिंग झाल्यावर या शेअरनं वेग पकडला. पहिल्याच दिवशी ५७ कोटी शेअर्सचे व्यवहार झाले आणि शेअर २० टक्क्यांनी वाढून ९१.२० रुपयांवर पोहोचला. तीच तेजी लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. आज सकाळी १४ कोटी शेअर्सचे व्यवहार झाले आणि २० टक्क्यांहून अधिक वधारलेल्या या शेअरला अप्पर सर्किट लागलं.

कंपनीनं १ ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून २,७६३ कोटी रुपये उभे केले. या गुंतवणूकदारांमध्ये देशांतर्गत म्युच्युअल फंड, देशांतर्गत जीवन विमा कंपन्या आणि परदेशी निधी यांचा सहभाग होता.

मनी कंट्रोलच्या मते, भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनी १४ ऑगस्ट रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. शेअर बाजारातील लिस्टिंगनंतर कंपनीची पहिलीच बोर्ड मिटिंग १४ ऑगस्ट २०२४ होणार आहे. त्याकडं गुंतवणूकदारांचं लक्ष आहे.

पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल १५ ऑगस्टला

ओला इलेक्ट्रिक आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलसाठी तयारी करत आहे. स्वातंत्र्यदिनी या बाइकचं लोकार्पण होणार आहे. अद्याप कोणताही अधिकृत तपशील उघड झालेला नसला तरी त्यावर बऱ्याच दिवसांपासून काम सुरू आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, ओलानं डायमंडहेड, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि क्रूझर या चार मॉडेलसह बाजारात आणल्या होत्या.

गुंतवणूकदारांनी काय करावं?

निराशाजनक लिस्टिंगनंतर ओला इलेक्ट्रिकचा शेअर सातत्यानं वाढत आहे. १५ ऑगस्ट रोजी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाइक बाजारात येणं अपेक्षित आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं काय करायचं अशा विचारात गुंतवणूकदार आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी मेहता इक्विटीजचे रिसर्च अ‍ॅनालिस्ट प्रशांत तपासे यांनी सल्ला दिला आहे. 'जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांनी सर्व बाबींचा विचार करून २ ते ३ वर्षांच्या किमान होल्डिंग कालावधीसाठी खरेदी करण्यास हरकत नाही. भाव पडेल तशी यात गुंतवणूक वाढवणं फायद्याचं ठरेल, असं तपासे लाइव्ह मिंटशी बोलताना म्हणाले.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मतं त्यांची वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

विभाग