Ola Electric IPO listing : ओला इलेक्ट्रिक कंपनीचा आयपीओ आज शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला. हा शेअर एनएसईवर ७६ रुपयांवर, तर बीएसईवर ७५.९९ रुपयांवर लिस्ट झाला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमतही ७६ रुपये इतकीच होती. त्यामुळं गुंतवणूकदारांची निराशा झाली होती. मात्र, ही निराश क्षणिक ठरली आहे. हा शेअर आता वेग पकडू लागला असून तो ८४ च्या पुढं गेला आहे.
ओला इलेक्ट्रिक आयपीओचा दरपट्टा ७२ ते ७६ रुपये निश्चित करण्यात आला होता. कंपनीनं एकूण १९५ शेअर्सचा लॉट बनवला होता. त्यामुळं किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ८२० रुपयांची गुंतवणूक करावी लागली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर ७ रुपयांची सूट देण्यात आली होती.
ओला इलेक्ट्रिकला आयपीओच्या माध्यमातून ६,१४५.५६ कोटी रुपये उभारायचे आहेत. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ७२.३७ कोटी नवे शेअर्स जारी केले आहेत. तर, ऑफर फॉर सेल अंतर्गत ८.४९ कोटी शेअर्स विक्रीस काढले आहेत. हा आयपीओ २ ऑगस्ट २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. गुंतवणूकदारांना ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्याची संधी होती.
बीएसईवर हा शेअर सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी १० टक्क्यांनी वधारून ८४.१४ रुपयांवर व्यवहार करत होता, तर एनएसई ८४.२१ रुपयांवर व्यवहार करत होता. त्यात सतत वाढ होतच असून १०.२७ मिनिटांनी हा शेअर ८७ च्या पुढं गेला आहे.
पहिल्या दिवशी ओलाचा आयपीओ ०.३८ पट सब्सक्राइब झाला होता. दुसऱ्या दिवशी आयपीओ फुल्ल होता. या दिवशी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ १.१२ पट सब्सक्राइब झाला होता. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ओलाआयपीओला सर्वाधिक ४.४५ पट सब्सक्रिप्शन मिळालं. या दिवशी रिटेल कॅटेगरीत ४ पटीपेक्षा जास्त सब्सक्रिप्शन झालं. ओला आयपीओबाबत किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. यामुळंच रिटेल कॅटेगरीत पहिल्याच दिवशी आयपीओ १०० टक्के सब्सक्राइब झाला.