Ola Electric IPO : आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडं कल असलेल्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ येत्या २ ऑगस्ट रोजी खुला होणार आहे.
भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. तर अँकर गुंतवणूकदारांसाठी (मोठ्या गुंतवणूकदारांसाठी) हा आयपीओ १ ऑगस्ट रोजी खुला होणार आहे. 'सीएनबीसी टीव्हा १८' नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. मात्र, ओला इलेक्ट्रिककडून यावर अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही.
मीडियातील वृत्तानुसार, ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ ९ ऑगस्ट रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे. या आयपीओ अंतर्गत कंपनी नवीन इश्यू आणि ९.५२ कोटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे ५,५०० कोटी रुपयांचे शेअर्स बाजारात विक्रीसाठी करणार आहे.
आयपीओ अंतर्गत विद्यमान भागधारक ९५.१९ दशलक्ष शेअर्सची विक्री करणार आहेत. कंपनीचे संस्थापक भावेश अग्रवाल ४७.३० दशलक्ष शेअर्सची विक्री करतील. याशिवाय कंपनीचे सुरुवातीचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल अंतर्गत अल्फावेव्ह, अल्पाइन, डीआयजी इन्व्हेस्टमेंट, मॅट्रिक्स आणि इतरांचे ४७.८९ दशलक्ष शेअर्स विकणार आहेत.
ओला इलेक्ट्रिकच्या गाड्यांचा रोड शो २९ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये कंपनीचे मूल्य ५.४ अब्ज डॉलर होतं. आयपीओ दरम्यान कंपनीचं मूल्य ४.२४ अब्ज डॉलर असेल असा अंदाज आहे.
ओला इलेक्ट्रिकनं २२ डिसेंबर २०२३ रोजी सेबीकडं कागदपत्रं दाखल केली होती. सेबीनं गेल्या महिन्यात आयपीओला मंजुरी दिली होती. कोटक महिंद्रा कॅपिटल, गोल्डमन सॅक्स, अॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, बोफा सिक्युरिटीज, सिटी, बीओबी कॅप्स आणि एसबीआय कॅप्स इन्व्हेस्टमेंट बँक म्हणून काम पाहणार आहेत.
न्यू एज कंपन्यांचा २०२४ मधील हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. आयपीओ आणणारी भारतातील पहिली स्टार्टअप कंपनी आता ओला इलेक्ट्रिक होणार आहे. टीव्हीएस मोटर्स, बजेट ऑटो आणि अथर हे या कंपनीसाठी मोठं आव्हान आहे.
संबंधित बातम्या